
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी हिंदुस्थानवरील सायबर हल्ले काही थांबलेले नाही. शासकीय यंत्रणा व विविध विभागांवर सायबर हल्ले राजरोसपणे सुरूच आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून आतापर्यंत दीड कोटी सायबर हल्ले झाल्याचे सांगण्यात येते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यानचे वातावरण प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हापासूनच हिंदुस्थानवर विविध ठिकाणांहून सायबर हल्ले केले जात आहेत. पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश व मोरक्कोमधून हे सायबर हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय होऊन युद्धजन्य परिस्थिती निवळली असली तरी सायबर हल्ले मात्र अद्याप थांबलेले नाहीत. आतापर्यंत जवळपास दीड कोटी सायबर हल्ले करण्यात आल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात येते. या दीड कोटी हल्ल्यांपैकी केवळ दीडशे हल्ले यशस्वी झाल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डाटा चोरल्याचे एव्हिएशन आणि म्युनिसिपल सिस्टम हॅक केल्याचा तसेच निवडणूक आयोगाला लक्ष्य केल्याचा सायबर हल्लेखोरांचा दावा असल्याचे समजते. सायबर हल्ल्यांविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सायबरने केलेला अहवात आयबी आणि महाराष्ट्र एटीएसला देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.