नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच रविवारी वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरजवळ दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बस दरीत कोसळून 10 भाविक ठार झाले. या हल्ल्याबाबत आता खळबळजनक माहिती समोर आली असून दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिक वापरत असलेल्या अमेरिकन बनावटीच्या एम-4 कार्बाईनमधून गोळ्या झाडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या पथकांनी हल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन तपास सुरू केला आहे. अबू हमजा आणि अधून अशा दोन संशयित दहशतवाद्यांचे फोटोही या तपास यंत्रणांनी जारी केले आहेत.
पाकिस्तानविरोधात निदर्शने
कटरा, दोडा शहर आणि कठुआ जिह्यासह संपूर्ण जम्मू प्रदेशात या हल्ल्यामुळे संताप व्यक्त होत असून, पाकिस्तानविरोधी निदर्शनेही कऱण्यात आली. जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी शेजारी देशावर कारवाई करण्याची मागणी केली.
हल्ल्यानंतर नजीकच्या दाट जंगलात दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असून त्यांचा शोध घेण्यासाठी हा जंगलभाग आणि डोंगराळ परिसराला वेढून सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
मृतांमध्ये जयपूरच्या दोन वर्षांच्या मुलासह चारजणांचे कुटुंब
जयपूरमधील दोन वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील चार जण या दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत. पोलीस उपायुक्त (पश्चिम) अमित कुमार यांनी सांगितले की, या हल्ल्यात कापड दुकानदार राजेंद्र सैनी (42), त्यांची पत्नी ममता सैनी (40), त्यांची नातेवाईक पूजा सैनी (30) आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा टीटू यांचा मृत्यू झाला. पूजाचे पती पवन (32) हे जखमी झाले आहेत.
दहशतवादी पाकिस्तानी?
या हल्ल्यात तीन परदेशी दहशतवादी सामील होते, असे सूत्रांचे म्हणणे असून, या परिसरात तीन दहशतवादी गट सक्रीय असल्याचे सांगण्यात आले. यात पाकिस्तानचा हात असण्याचा संशय आहे.
एम4 कार्बाईनमधून गोळय़ा झाडल्या
हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी अमेरिकन बनावटीच्या एम4 कार्बाईन रायफलींचा वापर केला होता. 1980 मध्ये विकसित करण्यात आलेल्या या रायफली जगभरातील अनेक देशांच्या सैन्याकडून वापरल्या जातात. पाकिस्तानी विशेष दले आणि सिंध पोलिसांचा विशेष सुरक्षा विभाग या रायफलींचा वापर करतो. या रायफलींतून दहशतवाद्यांनी मारा केल्यामुळे हल्ल्यामागील पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे.
म्हणून आम्ही बचावलो
या हल्ल्याच्यावेळी अंदाधुंद गोळीबारात बसचालक मारला गेल्यामुळे नियंत्रण सुटून बस दरीत खाली गेली. ही बस दरीत कोसळल्यानेच इतरांना जीवदान मिळाले असे बसमधील काही यात्रेकरुंनी सांगितले. दहशतवाद्यांना कुणालाही जिवंत सोडायचे नव्हते पण, बस दरीत खाली गेली. तरीही त्यांनी नंतर काही वेळ बसवर गोळीबार सुरूच ठेवला होता. या वेळी झाडे आणि दगडांच्या मागे लपून काही जणांनी स्वतःचा जीव वाचवला. चालकाशेजारच्या सीटवर बसलेल्या संतोष कुमारने सांगितले की, मी बस ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो. आमची बस घनदाट जंगलातून जात होती. त्यावेळी लष्करी गणवेशासारखे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने अचानक बससमोर येत अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्या व्यक्तीने काळ्या कपडय़ाने चेहरा आणि डोके झाकले होते.