
मध्यपूर्वेमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणचा नायनाट करण्याचा विडा उचलला असून तुफान बॉम्ब हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंघावू लागले आहे. अशातच अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी आली आहे. अमेरिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. यासाठी इराणी गुप्तहेरांनी पाकिस्तानी नागरिकाला सुपारी दिल्याचे समोर आले आहे. आसिफ मर्चंट (वय – 47) असे या पाकिस्तानी नागरिकाचे नाव आहे.
आसिफ मर्चंट याच्यावर अमेरिकेतील प्रमुख नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बुधवारी त्याला ब्रुकलिन फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याने इराणी गुप्तचर संस्थांनी आपल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रातील माजी अमेरिकन राजदूत निक्की हेली यांच्या हत्येसाठी भरती केले होते, अशी कबुली दिली.
इराणी गुप्तहेरांनी माझ्या कुटुंबाला धमक्या देऊन मला या कटात सहभागी होण्यास भाग पाडले. कुटुंबाला धोका असल्याने माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असे आसिफ मर्चंट याने कोर्टात सांगितले. दरम्यान, आसिफ मर्चंट याच्यावर अंडरकव्हर एफबीआय एचंटची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने 5 हजार अमेरिकन डॉलर्स देऊ केले होते.
आसिफ मर्चंट माजी बँक अधिकारी आहे. त्याचा केळीचाही व्यवसाय होता. मात्र केळी निर्यातीचा व्यवसाय ठप्प झाल्यानंतर एफ्रिल 2024 मध्ये एका इराणी हँडलरने त्याची संपर्क साधला होता. अमेरिकेत जाऊन कुणाची तरी हत्या करावी लागेल अशा सूचना आधी त्याला देण्यात आल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन आणि निक्की हेली ही तीन टार्गेट त्याला देण्यात आली होती. हा कट जेव्हा रचला जात होता तेव्हा ट्रम्प आणि बायडेन 2024 मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार होते. तर हेली यांनी या शर्यतीतून माघार घेतली होती.
दरम्यान, ऑगस्ट 2024 मध्ये आसिफ मर्चंट याला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याने आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर त्याने आपण मनी लॉण्ड्रिंगचे काम केल्याची कबुली दिली. इराणी हँडलर मेहरदाद युसेफ याने त्याला हत्येचा कट रचण्याचे आणि काही विशिष्ट कागदपत्र मिळवण्याचेही निर्देश दिले होते. युसेफ हा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चा सदस्य होता. कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी देऊन आपल्याकडून हे काम करून घेण्यात आल्याचा दावा आसिफने केला. तसेच मी पकडला जाईल हे देखील मला माहिती होते आणि पकडल्यावर सरकारला सर्व काही सांगणार होतो, असेही तो म्हणाला. त्याच्या या कबुलीनंतर आता कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावू शकते.

























































