पाकिस्तान गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानने सौदी अरेबिया, चीन या राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. एवढेच नव्हे तर सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. महागाई, भूकबळी वाढले आहेत. अशातच पाकिस्तान सरकार संसदेत मांजरी तैनात करण्यासाठी 12 लाख रुपये खर्च करणार आहे. कारण तिथल्या संसदेत भरपूर उंदीर झाले आहेत.
उंदरांमुळे खासदार त्रस्त आहेत. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजरी आणल्या जाणार आहेत. त्यासाठी लाखोंचा खर्च केला जाणार आहे. पाकिस्तानच्या कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथोरिटीने संसदेतील उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजरी आणण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय काही खास पिंजरेही लावले जाणार आहेत, जेणेकरून संवेदनशील भागामध्ये उंदरांचा शिरकाव होणार नाही. पाकिस्तानात आर्थिक संकट गडद झाले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.