
राजस्थान सीआयडी इंटेलिजेंसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथील रहिवासी प्रकाश सिंग उर्फ बादल (३४) असे आरोपीचे नाव आहे. तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर्सशी संपर्क साधत होता आणि हिंदुस्थानी सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता, असा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस आयजी प्रफुल्ल कुमार यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानी गुप्तचर कारवायांवर सतत लक्ष ठेवते. या देखरेखीदरम्यान प्रकाश सिंग राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधून संवेदनशील लष्करी माहिती गोळा करत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला पाठवत होता. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संशयित प्रकाश सिंग हा श्रीगंगानगरमधील साधुवाली लष्करी प्रतिष्ठानाजवळ दिसल्याची माहिती मिळाली. सीमा गुप्तचर पथकाने त्याला तिथे ताब्यात घेतले.
त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता तो हिंदुस्थानी आणि परदेशी व्हॉट्सअॅप नंबरशी विशेषतः पाकिस्तानी नंबरशी वारंवार संपर्कात असल्याचे सिद्ध झाले. त्याला श्रीगंगानगर येथील संयुक्त चौकशी केंद्रात नेण्यात आले आणि हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशीत असे दिसून आले की, तो ऑपरेशन सिंदूरच्या काळापासून आयएसआयच्या संपर्कात होता आणि तो हिंदुस्थानी लष्कराची वाहने, लष्करी प्रतिष्ठाने, सीमावर्ती भागांचे भौगोलिक स्थान, पूल, रस्ते, रेल्वे आणि नवीन बांधकाम प्रकल्पांबद्दल पाकिस्तानला माहिती पाठवत होता. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.



























































