
इस्त्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागला आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर एमएसएमई स्वरूपातील केमिकल उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रूड ऑइलचा पुरवठा इराणमधून होतो. युद्धामुळे हा पुरवठा बंद झाल्याने क्रूड ऑइल आणि सॉल्व्हेंट्सच्या दरात सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कारखाने अडचणीत आले असून ते बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
युद्धामुळे इराणकडून होणाऱ्या क्रूड ऑइल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम केमिकल उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉल्व्हेंट्सवर झाला असून गेल्या दहा दिवसांत सॉल्व्हेंट्सच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याशिवाय बॉयलरसाठी लागणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. विशेषतः नॅचरल गॅसच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याने गुजरात गॅस लिमिटेडने उद्योगांना गॅस वापर 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिक वापर झाल्यास दंड आकारण्याबाबतही नोटिसा देण्यात आल्याने उद्योगांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. नॅचरल गॅसवर चालणारे बॉयलर गॅसअभावी बंद पडल्यास अनेक कारखान्यांना त्याचा फटका बसणार आहे.
नॅचरल गॅस वापरावर निर्बंध
निर्यात होणाऱ्या मालवाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. समुद्रमार्गे तसेच हवाईमार्गे माल वाहतुकीचा खर्च वाढल्याने डिलिव्हरी कालावधी अनिश्चित झाला आहे. मुंबईहून होणारी हवाई मालवाहतूकही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेतही घट झाल्याने उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे विशेषतः एमएसएमई उद्योजक हवालदिल झाले आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेक कारखाने बंद पडण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कामगारवर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. आता पुन्हा युद्धजन्य परिस्थितीमुळे कारखाने बंद पडतील का, अशी चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे. दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटत असल्याने हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवरील कर्जाचे ओझे वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच युद्धजन्य परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास उद्योग, कामगार आणि अर्थव्यवस्थेसमोर संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































