हिट इफेक्टः झेडपीच्या शाळांचे वेळापत्रक बदलले, पालघरमधील शाळा सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्णतेचा परिणाम आता शाळांवरही होऊ लागला आहे. पालघर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून 16 ते 31 मार्च या कालावधीत शाळा सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. तसेच 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान या शाळा सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरतील. विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीची वेळ निवडल्याने पटसंख्येवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पालघर जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. उन्हाळ्याची ही तीव्रता आणखी 2.5 ते 3 महिने कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तलासरी तालुक्यात झेडपीच्या एकूण 154 शाळा असून त्यामध्ये 18,956 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिदुर्गम भागातून अनेक विद्यार्थ्यांना 2 ते 4 किलोमीटर चालत शाळेत जावे लागते. परतीच्या प्रवासात कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा यापूर्वी सकाळी 10.20 ते सायंकाळी 5 या वेळेत भरत होत्या. मात्र वाढत्या उष्णतेचा विचार करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सोयीसाठी शाळेची वेळ बदलण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढले असून सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई या तालुक्यांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे.

पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश
होळी आणि धुळवड संपल्यानंतर तलासरी तालुक्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे तलासरीमधील शाळांचे वेळापत्रक सोमवारपासून बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करून ठेवावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यासाठी आवश्यक ती काळजी मुख्याध्यापक व संबंधितांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.