गुजरातमधील ट्रॅव्हल एजंटने मराठी तरुणाला फसवले; पालघरचा उमेश धोडी युरोपमध्ये अडकला

गुजरातमधील ट्रॅव्हल एजंटने पालघरच्या उमेश धोडी या मराठी तरुणाला फसवले आहे. युरोपमधील अल्बानिया या देशात तो अडकला असून हेल्थ इन्शुरन्स नसल्याचे सांगत कंपनीने कामावरून काढले आहे. स्थानिक दलालांनीदेखील तू पुन्हा कामावर आला नाहीस तर गायब करून टाकू, अशी धमकी दिल्याने उमेशच्या पायाखालची जमीन घसरली आहे. भयभीत अवस्थेत त्याने समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित केला असून मला कोणत्याही परिस्थितीत येथील एजंटांच्या तावडीतून सोडवा. हिंदुस्थानात परत येण्यासाठी कुणीतरी मदत करा.. अशी ओक्साबोक्शी रडत विनवणी केली आहे.

गुजरातच्या बडोदा येथील रफिक घाची या दलालाने उमेश धोडी याला युरोपमध्ये नोकरी देण्याचे आमिष दिले होते. त्यानंतर त्या आमिषाला बळी पडून नोकरी करण्याच्या निमित्ताने धोडी युरोपमधील अल्बानिया या देशात गेला. मात्र तेथे गेल्यानंतर त्याला अन्यायकारक वागणूक देण्यात आली. हेल्थ इन्शुरन्स नसल्याचे सांगत त्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर तेथील दलालांनी तू आला नाहीस तर तुला गायब करू अशा धमक्या दिल्या. या धमक्यांना घाबरून उमेश धोडी याने पालघरमधील मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधून या जाळ्यातून सोडवण्याची मागणी समाजमाध्यमाद्वारे केली.

जाचातून कायमचे सोडवा!

पीडित उमेश धोडी हा पालघरमधील बच्चू मिया चाळ येथे राहतो. त्याला बडोदा येथील आय. ओ. आर. कंपनीकडून रफिक घाचीच्या वतीने अल्बानिया या देशात अमेक सोल्युलर ग्रुप या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती. मात्र त्याला नियमानुसार कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. उलट क्षुल्लक कारण सांगून कामावरूनच काढून टाकले. तेथे आपला छळ होत असून काय करावे हे समजत नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मला हिंदुस्थानात परत यायचे आहे. या जाचातून कायमचे सोडवा, अशी आर्त विनवणी उमेश याने आपल्या व्हिडीओतून केली आहे.