पालीतील घोटवडे पुलावर सावित्रीचा धोका, दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल

सुधागड तालुक्याच्या पालीतील घोटवडे पुलावर सावित्रीचा धोका निर्माण झाला आहे. अंबा नदीवरील हा पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक झाला असल्याने सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या पुलाचे बांधकाम खोळंबले असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

आजूबाजूचे गाव, आदिवासी वाड्या-वस्त्यांना दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा पालीचा घोटवडे पूल महत्त्वाचा समजला जातो. जर्जर व मोडकळीस आलेला हा धोकादायक पूल पूर्णपणे वाकला आहे. एखादे अवजड वाहन पुलावरून गेल्यास पूल हलू लागतो. तसेच संरक्षण कठडे तुटल्याने वाहने केव्हाही नदीत कोसळून खूप मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या नादुरुस्त व कमकुवत पुलावरून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

अवजड वाहतूक बंद करा
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 45 मीटर लांबी व 5 मीटर रुंदीच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 1991 मध्ये करण्यात आले होते. हा पूल आता अखेरची घटका मोजत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश झोरे यांनी केली आहे.