उजनी व वीर धरणांतून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात एक लाख 40 हजार क्युसेक्सने पाणी वाहत असून, भीमा (चंद्रभागा) धोक्याच्या पातळीच्या वर आहे. त्यामुळे नदीपात्रातील 6 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व 6 पूल पाण्याखाली गेले आहेत. या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील व्यासनारायण झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्यामुळे 35 झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणीपातळी आणखी वाढत असल्याने नागरिक व प्रशासन सतर्क झाले आहे.
पंढरपूर येथील नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 35 कुटुंबांना नोटिसा देऊन त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कुटुंबाचे उपजिल्हा रुग्णालयाशेजारील रायगड समाज दिंडी मठ व जुन्या न्यायालयासमोरील लोकमान्य विद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी सांगितले. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून फूड पॅकेटचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, दर वेळेस पूर येतो आणि आमचे स्थलांतर होते. हे व्हायला नको यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. नगरपालिकेने आम्हाला कायमस्वरूपी घरे बांधून देण्याची मागणी केली आहे.

6 बंधारे, 6 पूल पाण्याखाली
मुंडेवाडी, करोळे, पटवर्धन कुरोली, आवे, कौठाळी, गोपाळपूर, विष्णुपद हे 6 बंधारे, तर पंढरपूर येथील दगडी पूल, गोपाळपूर येथील जुना पूल, होळे-कौठाळी पूल, पुळूज शंकरगाव पूल, नेवरे-नांदोरे, पंढरपूर जुना अकलूज रोड पूल हे सहा पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधारे, पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
वीर धरणातून विसर्ग बंद
गेल्या बारा दिवसांपासून वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. यातच उजनीतून एक लाखाहून अधिकचा विसर्ग सुरू झाल्याने महापूर आला. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, वीर धरण परिसरात पाऊस थांबला असल्याने आज दुपारी धरणातून विसर्ग बंद केला आहे. यामुळे पंढरपुरातील पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे.
उजनीतून विसर्ग घटला; धरणात 121 टीएमसी पाणी
उजनी धरण व वीर पाणलोटक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीत 121 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सोमवारी उजनीतून एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सुरू होता. तो आज घटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, पूरस्थिती अद्यापि कायम आहे. उजनीतील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगी व हिळगे बंधारे भरून वाहत आहेत. काही गावांचे अंतर्गत रस्ते बंद झाले असून, शेतातील पिकांत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मंगळवारी सायंकाळी उजनीची पाणीपातळी 497.180 मीटर इतकी होती. एकूण पाणीसाठा 121.44 टीएमसी इतका असून, उपयुक्त पाणीसाठा 57.78 टीएमसी झाला आहे. गेल्या 12 तासांत पावसाचा जोर कमी झाल्याने होणारा विसर्गही कमी झाला आहे. सध्या मुख्य कालव्यात 1300 क्युसेक, पॉवर हाऊससाठी 1600, सीना-माढा योजनेतून 210, तर दहीगाव कालव्यात 100 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.