मदतीसाठी धावलेल्या ‘लक्ष्मणा’चा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात अडकला, पुढे काय झाले ते पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे, पंढरपूर

पंढरपुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरीक पुरात अडकले असून त्यांना जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे म्हणून लक्ष्मण पापरकर यांची ओळख आहे. त्यांनी पुरात अडकलेल्यांना जेवण आणि पिण्याचे पाणी पोहचवण्याचा निर्णय घेतला. एका ट्रॅक्टरमध्ये सगळं सामान भरून त्यांनी सहकाऱ्यांसह चंद्रभागा नदीच्या पलिकडे अडकलेल्या नागरिकांच्या दिशेने धाव घेतली.

गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लक्ष्मण पापरकर, अनंत अंकुशराव आणि त्यांचे इतर पाचसहा मदतीचा ट्रॅक्टर घेऊन निघाले होते. नदीच्या काठावर पोहचले तेव्हा चंद्रभागानदीच्या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. लक्ष्मण पापरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पाण्यातून वाट काढत पलिकडे असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहचवली. मदत करणारी मंडळी परत निघाली तेव्हा चंद्रभागेच्या पुलावर पाणी वाढले होते आणि त्याचा वेगही प्रचंड होता.

लक्ष्मण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुलावरून ट्रॅक्टर नेण्याचं ठरवलं. पुलाच्या मध्यभागी पोहचेपर्यंत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत पाणी शिरले होते. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ट्रॅक्टर नदीत खेचला जाऊ लागला होता. ट्रॅक्टर पाण्यात जाणार हे शंभर टक्के निश्चित होतं. ट्रॅक्टर चालवत असलेल्याच्या कंबरेपर्यंत पाणी आलं होतं, त्यामुळे तो देखील गांगरला होता.

लक्ष्मण पापरकर यांना धोका दिसायला लागला होता त्यांनी चालकाला धीर दिला. हे सगळं होत असताना काळामिट्ट अंधार झाला होता. पाण्याची पातळी एव्हाना बरीच वाढली होती आणि पाणी ट्रॅक्टरवरुन वाहील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मृत्यू समोर उभा असताना लक्ष्मण यांनी ट्रॅक्टर वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून दामटला आणि तो दुसऱ्या काठावर नेण्यात ते यशस्वी झाले. या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मण पापरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की प्रामाणिकपणे काम करणाराच्या देव नेहमी पाठीशी असतो. यावर विश्वास असल्यानेच आम्ही हे धाडस केले.