अडीच महिन्यांनंतर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन भाविकांची दर्शनासाठी गर्दी; रांग सारडा भवनच्या पुढे

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामाकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱयातील काम पूर्ण झाल्याने तब्बल अडीच महिन्यांनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला रविवार, 2 जून रोजी सुरुवात करण्यात आली. पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने विठ्ठलाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आस लावून बसलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शनरांग मंदिरापासून सारडा भवनच्या पुढे पत्राशेडच्या पुढे सरकली आहे. यातच रविवार वीपेंड असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दर्शनासाठी आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे रूप मिळवून दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील या सुरू असलेल्या कामात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील कामे प्राधान्याने पूर्ण करता यावीत म्हणून 15 मार्चपासून श्री विठ्ठल व रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले आहे. तर केवळ सकाळी 6 ते 11 या वेळेत मुखदर्शन सुरू होते. मात्र श्रींच्या गर्भगृहातील कामे पूर्ण झाली आहेत. यामुळेच श्रींचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे.