
सध्याच्या बदलत्या वैज्ञानिक युगात काळ्या जादूसारखे अनेक अघोरी प्रकार अजूनही सुरू आहेत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. कळंबोलीच्या स्मशानभूमीत तर काळ्या जादूकरिता चक्क स्मशानातील राखेचीच चोरी होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या ओम फट् स्वाहामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानात अघोरी पूजेचे साहित्य आणि विचित्र आकाराची चिन्हेदेखील सापडल्याची बातमी पसरली आणि संशयाचे दाट धुके व अफवा पसरू लागल्या. दरम्यान, राखेची चोरी करणारे नेमके कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी कळंबोलीवासीयांनी केली आहे.
कळंबोलीतील स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्ये सुरू असल्याचे समजताच याबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या. या स्मशानभूमीत विचित्र पद्धतीने मांडलेले पूजा साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर काळी जादू करण्याकरिता राखदेखील चोरण्यात येत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. हे कृत्य नेमके कोणी केले हे अद्याप समजले नसले तरी महापालिका व पोलीस यंत्रणेने याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
- रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमी परिसरात येतात आणि येथील राख चोरून अघोरी विधी पार पाडले जातात. ओम फट् स्वाहा करणाऱ्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
- काळ्या जादूसाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा व राखेची चोरी होत असूनही महानगरपालिकेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत रात्रीची गस्त वाढवून स्मशानभूमीची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करावी अशी मागणी केली आहे.






























































