
पनवेल रेल्वे स्थानक ‘टर्मिनल स्टेशन’ म्हणून विकसित केले जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केली. पनवेल येथे सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामाचा आढावा घेताना रेल्वेमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. पनवेलचा ‘टर्मिनल’ म्हणून विकास झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुकर होणार आहे.
पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनबरोबरच कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी प्रमुख रेल्वे स्थानक आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मोठ्या प्रमाणावर मेल-एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू असते. येथील ताण कमी करण्यासाठी पनवेल स्थानकाचा ‘टर्मिनल स्टेशन’ म्हणून विकास करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले. पनवेल रेल्वे स्थानकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन मार्गांचे बांधकाम तसेच यार्ड लेआउटची पुनर्स्थापना केली जात आहे. रेल्वेमंत्र्यांनी हार्बरवरील लोकल वाहतुकीची सुरक्षितता वाढवण्याच्या हेतूने सेन्सरआधारित प्रणालीच्या चाचण्यांचा आढावा घेण्यासाठी जुईनगर यार्डला भेट दिली.
जुईनगर यार्डमधील सर्व पॉइंट्स तसेच सिग्नलवर पॉइंट पोझिशन डिटेक्शन सिस्टम व सिग्नल अॅस्पेक्ट फीडबॅक सिस्टम प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आली आहे. या चाचण्यांचा अहवाल पुढील मूल्यांकन-मंजुरीसाठी आरडीएसओ आणि रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार आहे.