
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर भक्तिरस आणि स्त्राrमनाचा गहिवर एकत्र आणणारे नाटक क्वचितच पाहायला मिळते. ‘संगीत देवबाभळी’ हे असेच एक विलक्षण संगीत नाटक. भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित या नाटकाची आता हजाराव्या प्रयोगाकडे घौडदोड सुरू आहे. एका वेगळ्या वाटेवरच्या गंभीर नाटकाने सतत हाऊसफुलची पाटी मिळवणं आणि 100 टक्के ऑनलाईन तिकीट विक्रीचा विक्रम करणं ही विलक्षण गोष्ट आहे. ‘संगीत देवबाभळी’ने हा पराक्रम करून दाखवला आहे आणि म्हणूनच ह्या टप्प्यावर त्या नाटकाची पुन्हा एकदा समीक्षा करणं अपरिहार्य ठरतं.
नाटकाची गोष्ट संत तुकारामाच्या जीवनातील एका भावस्पर्शी प्रसंगाभोवती फिरते; पण पेंद्रस्थानी आहेत दोन स्त्रिया, आवली आणि रखुमाई. तुकोबांच्या अखंड नामस्मरणात संसार हरवून जातो आणि त्या संसाराची सारी जबाबदारी आवलीच्या खांद्यावर येते. गर्भवती अवस्थेतही ती डोंगरदऱयांत नवऱयाचा शोध घेत फिरते. हातात भाकरी, ओठांवर हाक… आणि अचानक देवबाभळीचा काटा पायात रुततो. आवली कोसळते. पुढे घडणारा प्रसंग अंगावर शहारे आणणारा.. स्वतः विठ्ठल तिच्या पायातील काटा काढतो! याच घटनेतून उलगडतो रखुमाईच्या अंतर्मनात ठसठसणारा प्रश्न. विठ्ठलासारखा महान देव एका सामान्य स्त्राrच्या चरणांना स्पर्श का करतो? ‘लखुबाई’ म्हणून आवलीच्या घरी येणारी रखुमाई तिची सेवा करते; पण तिच्या मनात असते कुतूहल, किंचित सल आणि देवावरचा रुसवा. त्या दोघांमधे घडणारा संवाद हा नाटकाचा कणा आहे. आवलीची कणखरता आणि रखुमाईची समजूतदार वेदना हे दोन्ही स्त्राrमनाचे प्रतिनिधित्व करतात.
आवली देवाला शिव्या घालते, पण त्यातही नामस्मरण दडलेले आहे, हे ती स्वतः कबूल करते. रखुमाई तिला विचारते-“लग्नाआधी सावकाराची लेक असताना तू हा दारिद्रय़ाचा संसार का स्वीकारलास?’’ त्यावर आवलीचे उत्तर केवळ वैवाहिक निष्ठsचे नाही, तर प्रेम आणि बांधिलकीचे प्रतीक ठरते. हा प्रसंग प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. रखुमाईचा त्रागा समजतो, पण तिचे देवावरचे निस्सीम प्रेमही तेवढेच ठळकपणे जाणवते. नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील संगीत. जुने-नवे अभंग कथानकात इतक्या समरसपणे गुंफले आहेत की प्रत्येक पद प्रसंगाला उंची देऊन जाते. अभंग ऐकताना आपण एखाद्या दरीकाठी बसून अनंतात डोकावत आहोत, अशी अनुभूती येते. कलाकार प्रत्यक्ष रंगमंचावर लाइव्ह गातात, त्यामुळे भक्तिरसाचा स्पर्श अधिक सजीव होतो.
रखुमाईची भूमिका साकारणाऱया मानसी जोशी आणि आवलीच्या भूमिकेतल्या शुभांगी सदावर्ते या दोघींच्या अभिनयात आणि गायकीत अक्षरशः सरस्वती वसली आहे. मानसी जोशींची रखुमाई भव्य, पण मनस्वी वाटते; तर शुभांगी सदावर्ते यांची आवली जमिनीवरची, कणखर आणि जिवंत भासते. त्यांच्या संवादातील टायमिंग, भावमुद्रा आणि अभंगांची साद प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन जाते. हे नाटक रंगभूमीवर आणणाऱया भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि निर्माता प्रसाद कांबळी यांचे विशेष कौतुक.
‘संगीत देवबाभळी’ हे केवळ संतकथेचे नाटय़रूपांतर नाही; तर ते स्त्रीच्या सहनशीलतेचा, तिच्या न बोलल्या गेलेल्या वेदनेचा आणि तिच्या असीम प्रेमाचा गौरव आहे. भक्ती आणि वास्तव यांचा सुरेख मेळ साधत असतानाच हे नाटक प्रेक्षकांना आत्मशांती देऊन जाते. रंगमंचावर देवी आणि एक सामान्य स्त्राr यांचा संवाद पाहताना जाणवते, देवत्व हे केवळ मंदिरात नसते; ते त्यागात, प्रेमात आणि कर्तव्यातही असते.
लेखक ः प्राजक्त देशमुख
दिग्दर्शक ः प्राजक्त देशमुख
कलाकार ः मानसी जोशी,
शुभांगी सदावर्ते
नेपथ्य ः प्रदीप मुळ्ये
प्रकाश ः प्रफुल्ल दीक्षित
संगीत ः आनंद ओक
निर्माते ः भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी
























































