
हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा पॅराग्लायडिंग करताना दोरखंड सुटून अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अरविंद असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायचा होता, मात्र त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते. त्यामुळे तिने खालीच थांबायचे ठरवले. पॅराग्लायडिंग करताना दोरखंड निखळला आणि अरविंदचा जमिनीवर आदळून मृत्यू झाला. या अपघातात पायलटही लॅण्डिंग करताना गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, पायलटकडे फ्लाइंगचा वैध परवानादेखील नव्हता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मागील वर्षी मनाली येथील सोलांग खोऱ्यातही एका तरुणाचा पॅराग्लायडिंग करताना खाली पडून मृत्यू झाला.



























































