Parbhani News – लोअर दुधनाचा कॅनॉल फुटला, शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान

सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाचा कॅनॉल शनिवारी (16 ऑगस्ट 2025) 5 ठिकाणी फुटून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कॅनॉल मधील पाणी थेट शेतात घुसले. यामुळे जमीन खरडून गेली आणि शेतकर्‍यांच्या पीकांचेही मोठे नुकसान झाले. दिवसभर या फुटलेल्या कॅनॉलवर संबंधीत अधिकार्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले.

लोअर दुधना प्रकल्पाचा उजवा कॅनॉल मांडवा, गोकुळवाडी, नांदापूर आदी 4 ठिकाणी फुटल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कॅनॉलचे काम निकृष्ट झाल्यामुळे आणि संबंधीत अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे शनिवार धुवांधार पावसात कॅनॉलच्या भिंती उखडून पडल्या. गोकुळवाडी येथील शेतकरी एकनाथ संभाजी आवाके, हनुमान आवाके, बाळासाहेब निवृत्ती आवाके (गट क्र.21) यांच्या शिवारामध्ये कॅनॉल फुटल्यामुळे उभे पीक वाहून गेले. शेती खरडून गेली. शेतीमध्ये मोठा खड्डा पडला. वरून धुवांधार पाऊस आणि कॅनॉलमधून वायुवेगाने येत असलेले पाणी यामुळे गोकुळवाडी शिवारात पाणीच पाणी झाले होते. गोकुळवाडीप्रमाणेच मांडवा येथील वसंत आरमळ, बालासाहेब आरमळ यांच्या शेतीचेही कॅनॉलमधील पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. शेतात मोठा खड्डा पडला. त्यांनी शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात नांदापूरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. मदन लांडगे यांनी सांगीतले की, आजच्या या कॅनॉल फुटीमुळे 20 ते 25 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधीत अधिकारी तथा अभियंता प्रसाद लांब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन बाधीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. कॅनॉल फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे कॅनॉलची लांबी ऐनवेळी नांदापूर, जलालपूरपर्यंतच ठेवण्यात आली. प्रत्यक्षात कॅनॉलची लांबी साबा, मुंबरपर्यंत वाढविण्यात येणार होती. परंतु शासनाचे बजेट कमी पडल्यामुळे लोअर दुधनाचा हा उजवा कॅनॉल कमी करवा लागला. संबंधीत गुत्तेदाराने कॅनॉलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे आणि संबंधीत अधिकार्‍यांची हलगर्जी, निष्काळजी झाल्यामुळे हा कॅनॉल फुटून शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागले.