मुंबई ही कोणाची हो…तर मुंबई ही कष्टकऱ्यांची, इथे प्रामाणिकपणे राबणाऱ्या हातांची… मुंबईला आपलं म्हणणाऱ्यांची असे म्हटले जाते. मुंबईच्या जडणघडणीत कष्टकरी आणि कामगार वर्गाचे मोलाचे योगदान आहे. मात्र हा वर्ग कायमच दुर्लक्षित राहतो. अशा कष्टकऱ्यांना सलाम करण्यासाठी परळमधील पराग सावंत या तरुणाने घरगुती गणेशोत्सवासाठी मिनीएचर आर्टच्या माध्यमातून अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत आहे.
परळ येथे राहणारा पराग सावंत हा तरुण दरवर्षी गणेशोत्सवात विशिष्ट थीम घेऊन कल्पक देखावे साकारतो. मग ती हरवत चाललेली गिरणगावाची चाळ संस्कृती असो किंवा आठवणींची खिडकी. यंदा त्याने देखाव्यातून कष्टकऱ्यांना सलाम केला आहे. त्याने मुंबईचे मूळ पुरुष असलेले कोळी बांधव, मुंबईकरांना जेवणाचे डबे वेळेवर पोहोचवणारे डबेवाले, नालेसफाई करणारे पालिकेचे कर्मचारी, उंच इमारतीत विटा वाहून नेणाऱ्या मजूर महिला, दादरच्या फुल मार्पेटला पहाटे पहाटे ताज्या फुलांची विक्री करणारे फुलवाले, धोबी घाटातील कामगार वर्ग आदींच्या प्रतिपृती मिनीएचर आर्टच्या माध्यमातून साकारल्या आहेत.
मुंबईला आपले म्हटलं की मुंबई तुम्हाला आपलेसे करते असे म्हणतात. याच मुंबईचा गाभा असलेला हा कामगार वर्ग कायमच दुर्लक्षित राहिला आहे. याच वर्गाची उजळणी म्हणून आम्ही गणरायाच्या सोबतीने त्यांना एक प्रामाणिक वंदना देतोय. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळावे हीच आमची यानिमित्ताने गणराया चरणी प्रार्थना! – पराग सावंत,परळ