महाराष्ट्राच्या ‘सचिन’ने पॅरिसमध्ये हिंदुस्थानची मान उंचावली; गोळाफेकमध्ये रौप्य पदकावर मोहर उमटवली

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदकावर मोहर उमटवली आहे. यामुळे हिंदुस्थानच्या पदकांची संख्या 20 वर पोहोचली आहे. याआधी हिंदुस्थानने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 19 पदकं जिंकली होती. या कामगिरीलाही हिंदुस्थानच्या खेळाडूंनी यंदा मागे टाकले.

मंगळवारी अवघा देश झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास पॅरिसमध्ये सचिन खिलारी याने महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचावली. सांगलीतील आटपाडी येथील रहिवासी असणाऱ्या सचिन खिलारी याने गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. मराठमोळ्या सचिनच्या या कामगिरीमुळे प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

गोळाफेकच्या अंतिम फेरीमध्ये सचिन खिलारी याने 16.32 मीटर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. तर ग्रेगने 16.38 मीटर गोळाफेक तर सुवर्ण, तर ल्युका बावोव्हिच याने 16.27 मीटर गोळाफेक करत कांस्यपदक जिंकले.