पार्ले-जी चा कारखाना होणार जमीनदोस्त, कारखान्याच्या जागेवर उभ्या राहणार टोलेजंग इमारत

विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध 2016 च्या मध्यातच थांबला होता. आता तब्बल 87 वर्षांचा इतिहास असलेला पार्ले प्रॉडक्ट्सचा विलेपार्ले (पूर्व) येथील मूळ कारखानाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पार्ले प्रॉडक्ट्स कंपनीने या कारखान्याच्या जागेवर भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) 7 जानेवारी रोजी या प्रकल्पाला अंशतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीनुसार कारखान्याच्या परिसरातील जुनी झालेली 21 बांधकामे पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कंपनीने 2025 च्या मध्यात मुंबई महापालिकेकडे पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आवश्यक पर्यावरणीय परवानग्यांसाठी अर्ज करण्यात आला.

सुमारे 5.44 हेक्टर (13.45 एकर) म्हणजेच 54,438.80 चौरस मीटर इतक्या विस्तीर्ण जागेवर असलेल्या या मोक्याच्या भूखंडावर एकूण 1,90,360.52 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये 1,21,698.09 चौरस मीटर क्षेत्र एफएसआयअंतर्गत, तर 68,662.43 चौरस मीटर क्षेत्र नॉन-एफएसआय अंतर्गत असेल. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3,961.39 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या पुनर्विकास योजनेत चार इमारती उभारण्यात येणार असून तीन व सहा मजली अशा दोन स्वतंत्र पार्किंग टॉवरचा समावेश असेल. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) विमानतळाच्या जवळीकतेमुळे आणि ‘एअर फनेल झोन’मध्ये येत असल्याने इमारतींच्या उंचीवर निर्बंध घालत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले होते. त्यानुसार एका इमारतीची कमाल उंची 30.40 मीटर, तर दुसऱ्या इमारतीची उंची 28.81 मीटर निश्चित करण्यात आली होती. मात्र, पर्यावरणीय मंजुरीच्या कागदपत्रांनुसार कंपनीने एका इमारतीसाठी 30.70 मीटर उंचीची मागणी केली असून ती निर्धारित मर्यादेपेक्षा 0.30 मीटर अधिक आहे.

प्रस्तावित चारही इमारतींना दोन तळमजले (बेसमेंट) असतील. पहिल्या तीन इमारतींच्या ‘ए-विंग’मध्ये सहा मजले असतील. पहिल्या इमारतीच्या ‘बी-विंग’मधील पहिला, सातवा आणि आठवा मजला दुकाने व कार्यालयांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून दुसऱ्या ते सहाव्या मजल्यांपर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यावसायिक संकुलामध्ये किरकोळ दुकाने, रेस्टॉरंट्स आणि फूड कोर्ट्सचा समावेश असणार आहे.

SEIAA च्या सुनावणीदरम्यान परिसरात एकूण 508 झाडे असल्याची नोंद घेण्यात आली. त्यापैकी 311 झाडे जतन केली जाणार असून 129 झाडे तोडली जातील आणि 68 झाडे स्थलांतरित केली जाणार आहेत. याशिवाय ‘मियावाकी’ पद्धतीने 1,203 नवीन झाडांची लागवड करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील झाडांची एकूण संख्या 2,230 इतकी होण्याची शक्यता आहे.

नवीन व्यावसायिक जागा कंपनी स्वतः वापरणार की ती अंशतः अथवा पूर्णपणे भाड्याने देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यासंदर्भात ‘हिंदुस्तान टाइम्स’ने पार्ले प्रॉडक्ट्सशी संपर्क साधला असता कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

1929 मध्ये चौहान कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या पार्ले प्रॉडक्ट्सच्या या कारखान्याने 2016 पर्यंत सलग 87 वर्षे उत्पादन सुरू ठेवले होते. विलेपार्लेच्या नावावरून ‘पार्ले-जी’ हे बिस्किट ओळखले जाते, तर ‘जी’ हे ग्लुकोजचे प्रतीक आहे. उत्पादन थांबवल्यानंतरही काही काळ या परिसरात कंपनीचे कर्मचारी कार्यरत होते. उत्पादन बंद करण्यामागे उत्पादकतेत झालेली घट हे मुख्य कारण असल्याचे कंपनीने त्यावेळी सांगितले होते.