
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत दुपारी 12 वाजता पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू करणार होते. मात्र, त्याआधीच संसदेत गोंधळाला सुरुवात झाली. या गदारोळामुळे ऑपरेशन सिंदूरवर अद्याप चर्चा सुरू होऊ शकली नाही. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू होणार होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत ही चर्चा सुरू करणार होते. मात्र सभागृहात सुरू असलेल्या गदारोळामुळे चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गादारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले आहे.या चर्चेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर तेजस्वी सूर्या आणि बैजयंत पांडा हे भाजपच्या वक्त्यांच्या यादीत आहेत. तर गौरव गोगोई हे काँग्रेसचे पहिले वक्ते असतील. प्रियंका गांधी यांचेही नाव वक्त्यांच्या यादीत आहे. काँग्रेसने त्यांच्या लोकसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन करणारा व्हीप जारी केला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना इशारा दिला आणि म्हणाले की, सभागृहात वर्तन योग्य ठेवा, हे सभागृह आहे. तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची असेल किंवा नसेल तरी, तुमच्या जागेवर बसा. विरोधी सदस्य वेलमध्ये बसून राहिले. यावर, बिर्ला म्हणाले की वेलमध्ये कोणताही मुद्दा उपस्थित केल्याने चर्चा होणार नाही. सभागृहात एक नियम प्रक्रिया आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर सभागृहात चर्चा होते. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होऊ शकली नाही आणि सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळावर गौरव गोगोई यांचे नाव घेतले आणि म्हणाले की तुम्ही आणि इतर पक्षाचे नेते आले होते. तुम्ही लोक चर्चेसाठी तयार होता, मग तुम्ही प्रश्नोत्तराचा तास का होऊ देत नाही. प्रश्नोत्तराचा तास हा खासदारांसाठी खूप महत्वाचा काळ आहे. सभागृह सर्वांचे आहे. देश पाहील की तुम्ही प्रश्नोत्तराचा तास चालू दिला नाही आणि कामकाजात अडथळा आणला.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संध्याकाळी 7.30 वाजता लोकसभेत बोलतील. गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या दिवशी लोकसभेत भाजपचे पहिले वक्ते असतील. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता आहे.