
जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी आता ‘ऑपरेशन त्राशी-1’ या मोहिमेद्वारे मोठी रणनीती आखली आहे. जानेवारी 2026 पासून सुरू झालेले हे ऑपरेशन सध्या जम्मूतील दहशतवादविरोधी कारवायांचे मुख्य केंद्र बनले आहे. शनिवारी पहाटे किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यासोबतच सीमावर्ती भागात पाकिस्तानी ड्रोनचा वावर आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे किश्तवाडच्या डोलगाम आणि चत्रू परिसरात दहशतवादी लपल्याची पक्की माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. या माहितीचे सखोल विश्लेषण केल्यानंतर हिंदुस्थानचे लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने या भागात संयुक्त शोध मोहीम राबवली. घेराबंदी घट्ट होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. व्हाईट नाईट कॉर्प्सने या कारवाईला दुजोरा दिला आहे. सध्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. या चकमकीत झालेल्या जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे, शनिवारी सकाळी जम्मू जिल्ह्यातील चालियारी या सीमावर्ती गावात एका पाकिस्तानी ड्रोनने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या ड्रोनवर चार राऊंड गोळीबार केला. त्यानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पसार झाले. या घटनेनंतर सीमावर्ती भागात मोठी शोध मोहीम राबवून शस्त्रास्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी झाली आहे का? याचा तपास केला जात आहे.
‘ऑपरेशन त्राशी-1’ हे केवळ तात्पुरत्या कारवाईपुरते मर्यादित नसून ती एक दीर्घकालीन रणनीती आहे. किश्तवाडमधील घनदाट जंगले आणि उंच डोंगररांगांचा फायदा घेऊन दहशतवादी आपली ठाणी उभारत असल्याचे समोर आले होते. हे नेटवर्क उध्वस्त करणे, त्यांचा रसद पुरवठा खंडित करणे आणि स्थानिक समर्थन यंत्रणा मोडीत काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जम्मूतून काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या मार्गांवरही आता सुरक्षा दलांनी करडी नजर ठेवली आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, या भागातील दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा होत नाही, तोपर्यंत हे संयुक्त अभियान सुरूच राहणार आहे.




























































