Video-निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप, बसपा नेत्यांना कार्यकर्त्यांनी धू धू धुतले

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीत बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रभाऱ्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना, प्रदेश महासचिव कृष्णा बेले, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार या नेत्यांची अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी या नेत्यांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला.

राज्यात सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना मतदान केले, तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या नेत्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर बसपा पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना या नेत्यांना धारेवर धरत त्यांच्यावर खुर्च्या फेकून मारहाण केली. या मारहाणीत बसपा नेत्यांचे कपडेदेखील फाडण्यात आले. कार्यकर्त्यांचा रुद्रावतार बघून काही नेत्यांनी अक्षरशः पळून जाऊन स्वत:ची सुटका करून घेतली. यावेळी “ताजणे हटाव बीएसपी बचाव” अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली .

आपली प्रतिक्रिया द्या