वंदे भारतमध्ये देण्यात आलेल्या जेवणात किडे सापडल्याने प्रवासी संतप्त, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांना त्यांच्या जेवणाच्या ताटात किडे आढळले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या ताटाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. देशातील सर्वात हाय-टेक ट्रेनमध्ये प्रवाशांना जेवण दिले जात असताना, वाटाणे, पनीर आणि दह्यासोबत काही किडे हे वळवळताना दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रवासी त्याच्या दह्याच्या कपात आणि जेवणाच्या ताटात किडे वळवळत असलेले दाखवत आहे. याबाबत प्रवाशांनी तक्रार केली, तेव्हा वेटर आणि कर्मचाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.

व्हिडिओमध्ये प्रवाशांचा संताप स्पष्टपणे दिसत आहे. एक प्रवासी म्हणत आहे, “बघा, आम्ही विष खाण्याचे पैसे देत आहोत.” आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा कर्मचाऱ्यांना याबद्दल (ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेतील समस्या) माहिती देण्यात आली, तेव्हा तेही आजूबाजूला पाहू लागले. लोक याला निव्वळ विश्वासघात म्हणत आहेत. प्रवाशांनी आरोप केला आहे की, जेवण केवळ खराबच नाही तर आरोग्यासाठी धोकादायकही होते.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे. एवढी तिकीटाची किंमत देऊनही जनतेला ‘निकृष्ट दर्जाचे’ जेवण मिळणार का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रवाशांचे म्हणणे आहे की प्रीमियम ट्रेनमध्ये असा प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही. वंदे भारतसारख्या आलिशान ट्रेनमधील असा निष्काळजीपणा खरोखरच चिंताजनक आहे.