
अहिल्यानगर – पुण्यातील सराईत गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ याने नाव आणि पत्ता बदलून सहजतेने पासपोर्ट मिळवला. नगर पोलिसांनी प्रतिकूल अहवाल दिल्यानंतरही त्याला पासपोर्ट कसा काय दिला गेला? या गंभीर प्रश्नावर आता बोट ठेवले जात आहे.
नीलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा. शिक्षणासाठी तो पुण्यात गेला आणि वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यानंतर त्याची ओळख गजानन मारणेसोबत झाली. या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून करून सात वर्षांची शिक्षा भोगली. तुरुंगातून सुटल्यावर आर्थिक आणि वर्चस्वावरून वाद झाले. पुढे पुण्यातील गोळीबार प्रकरणानंतर घायवळ थेट लंडनला पलायन केल्याचे उघड झाले आहे. अशा सराईत गुन्हेगाराने 23 डिसेंबर 2019 रोजी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात ‘तात्काळ योजना’ अंतर्गत पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला. अर्जात त्याने आडनाव बदलले आणि रा. गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड, अहमदनगर असा पत्ता नमूद केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी त्याला पासपोर्ट देण्यात आला.
या अर्जाची पडताळणी त्याच दिवशी ऑनलाइन प्रणालीद्वारे कोतवाली पोलिसांकडे आली होती. मात्र घायवळ नमूद केलेल्या पत्त्यावर मिळून आला नाही. कोतवाली पोलिसांनी 15 जानेवारी 2020 रोजी प्रतिकूल अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयानेदेखील 16 जानेवारीला “Not Available” अशी स्पष्ट नोंद करून हे प्रकरण पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाला परत पाठविले. तरीही पासपोर्ट कसा काय वितरित झाला? पोलिसांनी प्रतिकूल अहवाल दिल्यानंतरदेखील पासपोर्ट जारी होणे म्हणजे प्रक्रियेत मोठी त्रुटी असल्याचेच स्पष्ट करते.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी खुलासा करताना सांगितले, “नगर पोलिसांकडून अर्जदार घायवळबाबत पडताळणी करण्यात आली होती. तो दिलेल्या पत्त्यावर सापडला नव्हता. त्यामुळे प्रतिकूल अहवाल स्पष्टपणे पासपोर्ट कार्यालयाला पाठविण्यात आला होता.”