देशभरातील पासपोर्ट सेवा पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक अॅडव्हायजरी जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचे विभागाने म्हटलंय. या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाहीत. तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत.
जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल तर तीदेखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल. या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसणार आहे.
अपॉईंटमेंट रिशेड्यूल होणार
ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पाच दिवस विभागात कोणतेही काम होणार नाही. अपॉईंटमेंट पुन्हा शेड्यूल करण्याची सुविधा आमच्याकडे पहिल्यापासूनच आहे. पब्लिक सेंट्रीक सर्व्हीस (उदाहरणार्थ – पासपोर्ट सेवा केंद्र) साठी मेंटनन्स ऑक्टिव्हिटी नेहमी नियोनजबद्ध असते, जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होऊ नये. त्यामुळे अपॉईंटमेंट रिशेड्यूल करण्याचे आव्हान नसेल, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
पोर्टलचा उपयोग…
पासपोर्ट पोर्टलचा वापर नवा पासपोर्ट काढणे किंवा पासपोर्ट नूतनीकरणासाठी अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी होतो. मिळालेल्या अपॉईंटमेंट तारखेला आणि वेळेला अर्जदारांना पासपोर्ट केंद्रावर पोचायचे असते आणि कागदपत्रे दाखवून व्हेरिफिकेशन करून घ्यायचे असते.
अर्जदारांना अडचणी
आधीच्या अर्जानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अपॉइंटमेंट मिळाल्यास ती दुसऱ्या तारखेला बदलावी लागणार आहे. देशभरातील अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या कालावधीत लोकांना नवीन अर्ज करता येणार नाहीत.