
न्यायालयांत ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरू असते. त्यात अनेक खटल्यांची वर्षानुवर्षे रखडपट्टी होते. मग आरोपीच्या उतारवयात खटला निकालाच्या टप्प्यात पोहोचतो. पाटण्यातील अशाच एका फसवणुकीच्या खटल्यात न्यायालयाला 95 वर्षांच्या वृद्ध आरोपीसाठी चक्क रस्त्यावर दुर्मिळ व अनोखी सुनावणी घ्यावी लागली. वृद्ध आरोपी गाडीतून कोर्टात येऊ शकत नव्हता. त्यामुळे न्यायमूर्तींनी कोर्टाबाहेर जाऊन निकाल दिला आणि वृद्धाने गुन्हा कबूल केल्याच्या आधारे त्याला दोषी ठरवले.
सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अविनाश कुमार यांनी 15 वर्षांच्या जुन्या बॅंक फसवणूक प्रकरणाचा निकाल दिला. खटल्यातील 95 वर्षीय आरोपी जय नारायण सिंह चालू शकत नव्हते. त्यामुळे ते कोर्टाबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत झोपले होते. प्रकरण निकाली काढायचे होते. अशा स्थितीत आरोपी समोर हजर असणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती स्वतः कोर्टरूममधून बाहेर पडले आणि ते आरोपी सिंह असलेल्या गाडीजवळ जाऊन सुनावणी घेतली.

























































