वरळीच्या श्रीराम गिरणी कामगार सोसायटीची थकबाकी तातडीने द्या; शिवसेनेने उठवला विधिमंडळात आवाज

येथील श्रीराम मिलच्या जागेवर कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या श्रीराम गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतील 72 घरे म्हाडाला संक्रमण शिबिरासाठी देण्यात आली आहेत. मात्र या घरांचे गेल्या पाच वर्षांचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे सेवा शुल्क म्हाडाने दिलेले नाही. ते तातडीने देण्यात यावे असे निर्देश म्हाडाला द्यावेत, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

सदरहू सोसायटीमध्ये पहिला मजला ते अठराव्या मजल्यापर्यंतच्या 214 घरांचा ताबा 2014 मध्ये गिरणी कामगारांना देण्यात आला आहे. उर्वरित 19 ते 24 मजल्यांवरील 72 घरे संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. म्हाडाने जुलै 2021 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत त्या घरांचे सेवा शुल्क, पार्ंकग शुल्क देण्यास म्हाडाकडून टाळाटाळ केली जात आहे. सद्यस्थितीत या सोसायटीची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्याचा विपरीत परिणाम इमारतीमधील रहिवाशांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्यावर होत आहे, असे सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

मुंबई सेंट्रलचे नाव नाना शंकरशेट स्थानक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा

‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका’ला ‘नाना जगन्नाथ शंकरशेट’ यांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर करून पेंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तो मंजूर करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणीही सुनील शिंदे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.