
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक याने मेंटॉर पदाचा राजीनामा दिला आहे. वरवर त्याने राजीनामा दिला असे दिसत असले तरी आता आतली बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागले असून पैसे वाचवण्यासाठी शोएब मलिकसह 5 जणांकडून जबरदस्तीने राजीनामा घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये चॅम्पियन्स कपनंतर डॉल्फिन्स, लायन्स, पँथर्स, स्टायलिन्स आणि मारखोर्स संघाचे नवीन मेंटॉर निवडले होते. शोएब मलिकसह मिस्बाह उल-हक, वकार युनूस, सरफराज अहमद आणि सकलेन मुश्ताक यांची यात वर्णी लागली होती. या सर्वांचे कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षांचे होते आणि त्यांना 50 लाख पाकिस्तानी रुपये सॅलरी निश्चित करण्यात आली होती.
देशांतर्गत क्रिकेटला नवी उभारी देण्यासाठी पीसीबीने हा निर्णय घेतला होता. मात्र फ्लॉप शो आणि पैशांची तंगी यामुळे या सर्वांवर टांगती तलवार होता. आपल्याला काढून टाकण्यात येणार हे कळताच शोएब मलिक याने राजीनामा देत काढता पाय घेतला.