जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईत ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या बहुप्रतीक्षित कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लाईव्ह शो, कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत होणाऱ्या काळाबाजाराकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांची गंभीर दखल घेतली आणि दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी निश्चित केली. मोठ्या कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. याचिकेवर न्यायालय काय निर्देश देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत अनियमितता झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यावरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अॅड. अमित व्यास यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे जनहित याचिका सादर केली.
लाईव्ह शो, कॉन्सर्टसारख्या मोठ्या इव्हेंटच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीची गंभीर दखल घेत खंडपीठाने दिवाळी सुट्टीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.
कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे ‘बुक माय शो’ या ऑनलाइन बुकिंग वेबसाइटवर उपलब्ध होती. ‘बुक माय शो’ने कॉन्सर्टच्या ऑनलाइन तिकीट विक्रीत फेरफार केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.