बॉलीवूडमध्ये सुपरहिरोपटांची धूम, आता ‘फँटम’ साठी तयारीला सुरुवात

754

80 च्या दशकात कॉमिक्स वाचणाऱ्यांना ‘फँटम’ हा सुपरहिरो परिचयाचा आहे. कॉमिक्सवर आधारीत चित्रपटाची हॉलीवूडमध्ये निर्मिती झालेली आहे. सुपरहिरोपटांची भुरळ पडलेल्या बॉलीवूडमध्येही आता ‘फँटम’ चित्रपटाची निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रॉनी स्क्रूवाला आणि वासन बाला या दोघांनी या सुपरहिरोपटाची निर्मिती करायचं ठरवलं आहे. ‘इंमॉर्टल अश्वत्थामा’ या सुपरहिरोपटानंतर रॉनी स्क्रूवाला यांना फँटमची निर्मिती करायचं निश्चित केलं आहे.

वासन बाला यांनी ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटाची कथा लिहिली होती. त्यांनी रॉनी स्क्रूवाला यांच्यासमोर फँटम चित्रपटाची कल्पना मांडली जी त्यांना तत्काळ आवडली. या चित्रपटासाठीचे आवश्यक ते अधिकार आणि परवानगी मिळवण्यात आली असून त्याच्या कथालेखनाला सुरुवात होणार आहे. 2020 च्या उत्तरार्धात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

ली फॉल्क हे फँटमचे जनक आहेत. 17 फेब्रुवारी 1936 साली वर्तमानपत्रामध्ये फँटम मालिकेला सुरुवात केली होती. 28 मे 1939 पासून ही मालिका रंगीत अवतारात प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. या मालिकेवरून टीव्ही मालिका, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्सही बनवण्यात आले आहेत. इतर सुपरहिरोंप्रमाणे फँटमकडे कोणत्याही अमानवीय शक्ती नसतात. घनदाट जंगलात राहणारा फँटम हा आदिवसींचा रक्षणकर्ता असतो आणि या आदिवासींमध्ये दंतकथा असते की फँटम कधीच मरत नाही.

2020 साली सुपरहिरो पटांची लाट येणार असून यामध्ये क्रिश-4, ब्रम्हास्त्र, रक्षक या चित्रपटांचा समावेश आहे. क्रिश-4 मध्ये ह्रितिक रोशनचा कोणत्या खलनायकासोबत मुकाबला होणार याची उत्सुकता आहे. ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका आहे. रक्षकमध्ये व्हिजिलांटे म्हणजेच समाजाचा रक्षणासाठी दुष्टांशी मुकाबला करणाऱ्या सुपरहिरोची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट देखील कॉमिक्सवर आधारीत असून संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या