
भौतिकशास्त्राचा नियम आहे की, घर्षण होण्यासाठी दोन वस्तूंचा संपर्क होणे आवश्यक आहे. मात्र या नियमाला छेद देत कोन्स्टान्झ विद्यापीठाने भौतिकशास्त्राचा 300 वर्षे जुना नियमच बदलला आहे. प्रत्यक्ष स्पर्श न होताही घर्षण होऊ शकते. थोडक्यात, घर्षण होण्यासाठी दोन गोष्टी एकमेकांना घासण्याची गरज नसते, असे नवे संशोधन कोन्स्टान्झ विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे.
दोन वस्तू एकमेकांना घासल्या की घर्षण निर्माण होते. वजन जास्त असेल तर घर्षणही जास्त असते, यालाच ‘आमोंटन्सचा नियम’ (Amontons’ Law) म्हणतात; परंतु कॉन्स्टान्झ विद्यापीठाच्या संशोधकांनी, प्रत्यक्ष स्पर्श न होताही घर्षण होऊ शकते आणि ते नेहमी वजनानुसार वाढत नाही, असा शोध लावला आहे. जुन्या नियमाप्रमाणे, अंतर कमी केल्यावर म्हणजे भार वाढवल्यावर घर्षण सतत वाढायला हवे होते. पण कोन्स्टान्झ विद्यापीठाने संशोधन केलेल्या प्रयोगात तसे झाले नाही. संशोधकांनी यासाठी चुंबकीय शक्तीचा वापर केला. चुंबकाच्या दोन थरांचा वापर करत, वरच्या थरातील चुंबक फिरण्यासाठी मोकळे ठेवले तर खालचे चुंबक स्थिर होते. हे दोन थर एकमेकांना स्पर्श करणार नाहीत अशा पद्धतीने ठेवण्यात आले. जेव्हा हे दोन्ही चुंबक एकमेकांवरून हलतात, तेव्हा त्यांच्यातील चुंबकीय आकर्षणामुळे वरचे चुंबक आपली दिशा बदलते. या बदलामुळे ऊर्जा खर्च होऊन घर्षण निर्माण होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
घर्षणाचे कारण काय…
घर्षण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, दोन्ही थरांमधील चुंबकीय रचनेत होणारा संघर्ष असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. जेव्हा चुंबकाचे दोन्ही थर एका विशिष्ट अंतरावर येतात, तेव्हा त्यांच्यातील चुंबकीय अलाईनमेंट बदलण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, ज्यामुळे घर्षणाचा एक ‘उच्चांक’ (पीक) तयार होतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
हे आहेत नवीन निष्कर्ष…
प्रत्यक्ष स्पर्श नसल्यामुळे यंत्रांचे भाग घासले जात नाहीत किंवा त्यांची झीज होणार नाही आणि चुंबकीय शक्तीचा वापर करून आपण स्पर्श न करता घर्षण नियंत्रित करू शकतो, असे दोन महत्त्वाचे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत. भविष्यात याचा वापर नॅनो-मशीन्स, चुंबकीय बेअरिंग्ज आणि कंपन रोखणाऱया यंत्रणांमध्ये केला जाऊ शकतो, असे या संशोधनात म्हटले आहे.

























































