अमेरिकेतून आलेल्या कबुतराला ठार मारण्यासाठी ऑस्ट्रेलियात धावपळ

शंभर दोनशे नाही तर तब्बल 13 हजार किलोमीटरचं अंतर पार करून अमेरिकेतील एक कबूतर ऑस्ट्रेलियाला आलं आहे.  या कबुतराला हुडकून ठार मारण्यासाठी ऑस्ट्रेलियात पळापळ सुरू झाली आहे.  पांढऱ्या रंगाचं हे कबूतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील ओरेगॉन इथल्या स्पर्धेत उतरवण्यात आलं होतं. या स्पर्धेतून हे कबूतर गायब झालं होतं.  त्यानंतर हे कबूतर ऑस्ट्रेलियात दिसून आलं आहे.

या कबुतराचं नाव ‘जो’ असून त्याच्या पायाला बांधण्यात आलेल्या निळ्या पट्ट्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.  ऑक्टोबर 2020 पासून या कबुतराने त्याचा प्रवास सुरू केला होता, जो 26 डिसेंबरला मेलबर्न इथे थांबला.  हे कबूतर असंख्य आजारांना कारणीभूत ठरू शकतं असं ऑस्ट्रेलियातील सरकारने जाहीर केलं आहे. याच कारणामुळे त्याला ठार मारण्याचं ठरवण्यात आलं आहे.  ज्या निळ्या बँडवरून या कबुतराची ओळख पटवण्यात आली आहे तो बँड नकली असल्याचं डियॉन रॉबर्ट्सने म्हटलं आहे. डीयॉन हा अमेरिकेतील कबूतर क्रीडा स्पर्धा संघटनेचा क्रीडा विकास अधिकारी म्हणून कामाला आहे.  त्याने म्हटलंय की ऑस्ट्रेलियातील कबुतराच्या पायात जो बँड सापडला आहे तो अमेरिकेतील कबुतरांच्या निळ्या बँडपासून वेगळा आहे.  स्पर्धेतून पळून गेलेलं कबूतर जर ऑस्ट्रेलियात सापडलेलं कबूतर असतं तर आम्ही त्याची ओळख सहजपणे पटवू शकलो असतं असं डीयॉनचं म्हणणं आहे.  हे कबूतर ऑस्ट्रेलियाचंच असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागाकडून या कबुतराच्या पायातील बँड  नकली असेल तर त्याला ठार मारण्यात येईल  की नाही याबाबत खुलासा केलेला नाहीये.  मात्र हे कबूतर ऑस्ट्रेलियाचं नसून त्याला ऑस्ट्रेलियात राहण्याचा अधिकार नसल्याचं तिथल्या प्रशासनाने म्हटलं आहे. या कबुतरामुळे ऑस्ट्रेलियातील खाद्य सुरक्षा आणि जगली पक्षांना धोका असल्याचं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे.

या कबुतराला मारू नका मी त्याला माझ्या घराच्या छतावर ठेवतो असं ऑस्ट्रेलियातील केव्हीन सेलिबर्ड नावाच्या नागरिकाने म्हटलं आहे.  केव्हीनने म्हटलंय की जेव्हा हे कबूतर त्याच्या छतावर उतरलं तेव्हा ते थकलेलं होतं. त्याने या कबुतराच्या पंखावरील आकड्यांच्या आधारे अमेरिकेतील त्याच्या मालकाला शोधण्याचाही प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे कोणालाही धोका नसल्याचं केव्हीनचं म्हणणं आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आपल्या म्हणण्यावर ठाम असून हे कबूतर देशात राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या