Pimpri-Chinchwad पिंपरीत पाच वर्षात वाढल्या 1 लाख मालमत्ता, सर्वाधिक मालमत्ता निवासी

रोजगाराच्या उपलब्ध असलेल्या संधी, सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था यामुळे पिंपरी-चिंचवड शहर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षांत शहरातील मिळकतींची अर्थात इमारती, घरे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात गेल्या वर्षभरात पाच लाख २७ हजार ३३५ वरून सहा लाखांच्या पुढे मालमत्ता गेल्या आहेत.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतींचे क्षेत्र एकत्र करून ४ मार्च १९७०ला पिंपरी-चिंचवड या नवनगराची निर्मिती करण्यात आली. शहरात उद्योगधंदे वाढत असतानाच, ११ ऑक्टोबर १९८२ ला महापालिकेची स्थापना झाली अन् शहर वाढत गेले. १९९७ मध्ये ८३ हजार १९८ मालमत्ता होत्या. मात्र, त्यानंतर ११ सप्टेंबर १९९७ मध्ये नव्याने हद्दवाढ झाली. तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चहोली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुडर्डी, किवळे, रावेत आदी गावे महापालिकेत केली. त्यानंतर खऱ्या अर्थान शहराचा विस्तार वाढत गेला. शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांवर पोहोचली आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नेहरू अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली. शहराच्या विविध भागांत झालेली उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव यांसह महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पांमुळे हा परिसर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो नव्या इमारतींची भर पडत आहे. सन २०२० मध्ये शहरात ५ लाख २७ हजार ३३५ मालमत्ता होत्या. सध्या ६ लाख ३० हजार ४८८ मालमत्ता आहेत. यावरून शहराच्या वाढीचा आलेख लक्षात येत आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास येत आहे. मात्र, या भागात अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांसह वाहतूककोंडीची समस्या आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसीलगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे.

२७ वर्षांत साडेपाच लाख मिळकती वाढल्या

१९९७ला शहरात फक्त ८३ हजार १९८ मालमत्ता होत्या. त्यानंतरच्या दहा वर्षांत सव्वा दोन लाखांवर मिळकती गेल्या. खऱ्या अर्थाने शहराची लोकसंख्या आणि मालमत्तावाढीला २०१२ नंतर वेगाने सुरुवात झाली. सद्यस्थितीत ६ लाख ३० हजार ४८८ मालमत्ता झाल्या असून, २७ वर्षांत यामध्ये तब्बल ५ लाख ४७ हजार २९०ची वाढ झाली आहे.