
शाश्वत ऊर्जेतून विजेची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला असून, आतापर्यंत शहरात 72 ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. त्या माध्यमातून सुमारे एक कोटी 80 लाख रुपयांची बचत होत आहे. चालू आर्थिक वर्षात 84 ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारून सुमारे तीन हजार 97 किलोवॅट वीजक्षमतेचे प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे.
शहराची पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महापालिकेने ‘शाश्वत विकास सेल’ची स्थापना केली आहे. त्याद्वारे पर्यावरणसंवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिका भवनसह विविध प्रशासकीय इमारती, शाळा, नाट्यगृहे, रुग्णालय इमारतींवर सौरऊर्जेचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आतापर्यंत निगडी-प्राधिकरण कार्यालय, चिंचवड येथील तारांगण, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, मोहननगर येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन, संभाजीनगर येथील शाहू जलतरण तलाव, मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, हेडगेवार भवन या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या ठिकाणच्या सौरऊर्जा पॅनेलमधून 1.47 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. त्यातून वार्षिक 20 लाख 10 हजार युनिट मोफत वीज उपलब्ध होत असून, सुमारे एक कोटी 80 लाख 98 हजार रुपयांची बचत होत आहे. दुसऱ्या टप्प्यात नवीन 84 ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातून तीन मेगावॅट वीज तयार होण्याची शक्यता असून, महापालिकेची वार्षिक चार कोटी 83 लाख रुपयांची बचत होईल, असा दावा केला जात आहे.
मागील पाच वर्षांत वीज बिलापोटी जेवढी रक्कम महापालिकेला अदा करावी लागली आहे, ती सौरऊर्जा प्रकल्पासून वसूल होण्यास मदत झाली आहे. पालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवरही सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येणार आहे. 2023-24मध्ये महापालिका क्षेत्रात नवीन प्रकल्पाअंतर्गत 90 सौरतापक बसविण्यात आले आहेत. तसेच महापालिका क्षेत्रात बांधकामास परवानगी देताना सौरऊर्जेचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळे मोठ्या गृहप्रकल्पांतील (रहिवासी) इमारतींमध्ये सौरतापक वापरण्यात येत आहेत. अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढविणे आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमी करण्याचे धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे.
पालिकेच्या वीजनिर्मितीचा तपशील
शहरात 72 ठिकाणी सौरऊर्जेतून 1.47 मेगावॅट वीजनिर्मिती
वार्षिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपयांची बचत
मोशी येथे कचऱ्यापासून 14 मेगावॅट वीजनिर्मिती
84 ठिकाणी प्रकल्पातून तीन मेगावॅट वीजनिर्मितीचा संकल्प
वार्षिक सुमारे 50 कोटी रुपये बचतीचा संकल्प
सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार शहरात 84 ठिकाणी सुमारे तीन हजारांहून अधिक किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. यामध्ये महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे. त्या माध्यमातून महापालिकेची वार्षिक सुमारे साडेचार कोटी रुपयांहून अधिक बचत होणार आहे.- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका




























































