उमेदवारांची निष्ठा दोन वेगवेगळ्या पक्षांशी! तिकीट मिळेल की नाही या शंकेने दोन अर्ज

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ आज मंगळवारी काही तास शिल्लक असतानाही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्जावर पक्षाचे अधिकृत नाव टाकायचे किंवा नाही, या चिंतेत उमेदवार आहेत. मात्र, काही उमेदवारांनी तर यावरही नामी शक्कल लढविली आहे. एका पक्षाने तिकीट डावलल्यास त्वरीत दुसऱ्या पक्षात उडी घेता यावी यासाठी उमेदवारांनी दोन उमेदवारी अर्ज भरून दोन वेगवेगळ्या पक्षांची नावे नमूद केली आहेत.

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सहा दिवस उलटून गेल्यानंतरही ५७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्जावर पक्षाचे अधिकृत
नाव टाकायचे किंवा नाही, या चिंतेत उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पक्षाचे नाव न टाकताच अर्ज दाखल करून ठेवले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अर्जासोबत एबी फॉर्म जोडणे बंधनकारक आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आज ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अनेक उमेदवार राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्म मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मुदत संपायच्या शेवटच्या काही वेळात अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे एबी फॉर्मकडेच डोळे लागले आहेत. मात्र, यावरही काही उमेदवारांनी नामी शक्कल लढविली आहे. आपला पत्ता कट होणार नाही, याची खबरदारी उमेदवारांनी घेतली आहे.

इच्छुकांचा ‘प्लॅन बी’ तयार

मतदारांच्या पसंतीचा अहवाल, आर्थिक क्षमता आणि निवडणूक खर्च उचलण्याची ताकद या निकषांवरच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे तिकीट मिळाले, तर ठीक अन्यथा कोणत्याही परिस्थितीत अपक्ष किंवा जो पक्ष तिकीट देईल. त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, अशी ठाम भूमिका अनेक इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे.