केवळ वैमानिकच नव्हे तर विमानही बदलले! रोहित पवारांनंतर पिंकी मालीच्या वडिलांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी जी शंका व्यक्त केली आहे, त्यावरून हा घातपात असू शकतो असा संशय आम्हालाही आहे. अजितदादांच्या विमानाचा पायलटच नव्हे, तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माली हिच्या वडिलांनी केला आहे.  अजित पवार यांच्यासोबत यापूर्वी पिंकी मालीने चार वेळा काळय़ा आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र त्यांना पांढऱ्या रंगाचे विमान देण्यात आले, असे का? या अपघातात आम्हीही मुलगी गमावली आहे. त्यामुळे या अपघाताचं नेमपं कारण आम्हाला समजलं पाहिजे. जी व्हीएसआर कंपनी आहे, त्याचे अधिकारी आम्हाला याबद्दल काहीही माहिती देत नाहीत. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या संशयावर तपास झाला पाहिजे, असे पिंकीचे वडील शिवकुमार माली म्हणाले.

पिंकीने आदल्या दिवशी मला फोन करून अजित पवारांबरोबर प्रवास करणार आहे. बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यावर तुमच्याशी पह्नवर बोलेन, असे पिंकीने सांगितले होते. तुला काय बोलायचे आहे, असे विचारले असता तिने सांगितले की, मला खूप काही बोलायचे आहे. पण दुर्दैवाने अपघात झाला, असेही शिवकुमार माली यांनी सांगितले.

सकाळी 6 वा. मुंबईत कुठे ट्रफिक असते?

वाहतूककोंडीमुळे विमानाचा पायलट पोहोचू शकला नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, मुंबईत सकाळी 6 वा. कोणत्या भागात ट्रफिक असते, असा प्रश्न उपस्थित करत पायलट बदलल्याबाबत माली यांनी संशय व्यक्त केला आहे.