Pro Kabaddi League च्या अकराव्या मोसमाला 18 ऑक्टोबरपासून हैद्राबाद येथे सुरुवात होणार आहे. कबड्डी विश्वातील या अत्यंत महत्वाच्या स्पर्धेसाठी Bengal Warriors संघाने कर्णधारपदी फझल अत्राचलीची, तर उपकर्णधारपदी नितेश कुमारची घोषणा केली आहे.
बंगाल वॉरियर्सचा संघा निळ्या पोशाखात खेळताना दिसणार आहे. या संघात मनिंदर सिंग या हिंदुस्थानातील सर्वोत्तम चढाई पटूचा समावेश आहे. यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावातून बंगाल वॉरियर्स संघाने अतिशय समतोल संघाची निवड केली आहे. कर्णधार फझल अत्राचली व मनिंदर सिंग ही जोडी यंदाच्या मोसमात संस्मरणीय कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. प्रो कबड्डी लीग मधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेला फझल PKL च्या दुसऱ्या मोसमापासून स्पर्धेत सातत्याने खेळत आला आहे. मात्र बंगाल कडून पहिल्यांदाच खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सुलतान या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या 35 वर्षीय फझलने आतापर्यंत 169 सामने खेळले असून त्याने तब्बल 494 गुणांची कमाई केली आहे.
या संघाचा उपकर्णधार नितेश कुमार हा अनुभवी खेळाडू असून 2017 पासून स्पर्धेत सहभागी आहे. फझल अत्राचलीच्या सोबतीने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये 129 सामन्यांमध्ये त्याने 354 गुण मिळवले. फझल प्रमाणे तो सुद्धा पहिल्यांदाच बंगाल संघात खेळताना दिसणार आहे. सहाव्या मोसमात 100 गुणांची कामगिरी करून संस्मरणीय पुरस्कार मिळवणारा नितेश कुमार यंदाच्या मोसमातही आपला ठसा उमटवेल असा सर्वांना विश्वास आहे.