स्वीडनच्या धर्तीवर ‘मिठी’चे सुशोभीकरण

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईचे वैभव असलेल्या मात्र सध्या घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेल्या मिठी नदीचे लवकरच स्वीडनच्या धर्तीवर सुशोभीकरण होणार आहे. यामध्ये नदीचे प्रदूषण रोखून बोटिंग, जॉगिंग-सायकलिंग ट्रक, उद्याने, मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था अशा अद्ययावत सुविधा केल्या जाणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे प्रेझेंटेशन करण्यात आले.

मिठी नदीच्या प्रदूषणाचा भार दिवसेंदिवस वाढत जात असून रहिवासी व औद्योगिक कंपन्या, विविध नाल्यांमधून दररोज दशलक्ष लिटर सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टी होऊन आलेल्या पुराला मिठी नदीदेखील कारणीभूत ठरल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर नदीच्या पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आल्यानंतर प्रदूषित नदीचे पाणी शुद्ध करून संपूर्ण नदीचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, संबंधित स्वीडन कंपनीच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे प्रेझेंटेशन करण्यात आले. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागाचे एरीक सोहेम, पर्यावरणप्रेमी आफरोज आदी उपस्थित होते. मिठी नदीचे सौंदर्यीकरण करताना मिठी नदीची खोली, रुंदी आणि या ठिकाणी राहणाऱ्या रहिवासी संघांसोबतच्या चर्चेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

जलशुद्धीकरणाच्या चार टप्प्यांत होणार सुधारणा

  • टप्पा – 1 ; फिल्टरपाडा ते पवई जल विभाग यार्डापर्यंत 2 कि.मी.ची लांबी
  • टप्पा – 2 ; पवई जलविभाग यार्ड ते सी.एस.टी. पूल, कुर्ला
  • टप्पा – 3 ; भरती प्रकण क्षेत्रातील नदीची लांबी
  • टप्पा – 4; बापट नाला ते नवीन घाटकोपर केंद्रापर्यंत मलजल बोगद्याचे बांधकाम

मिठी नदीची वैशिष्टय़े

  • मिठी नदीची एकूण लांबी -17.84 कि.मी
  • एकूण पाणलोट क्षेत्र-7295 हेक्टर
  • पालिकेच्या ताब्यातील मिठी नदी -11.84 कि.मी
  • ‘एमएमआरडीए’च्या ताब्यातील मिठी -6.00 कि.मी

चुकीचे काम झाले तर  निलंबन व्हायलाच हवे! आदित्य ठाकरे यांचे ठाम मत

मुंबईत पाणी साचणारी ठिकाणे कमी करण्यासाठी वर्षभर काम केले जात असताना काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे काही ठिकाणी  पाणी  तुंबल्याने मुंबईकरांची गैरसोय होते. त्यामुळे चुकीचे काम झाले तर संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन व्हायलाच हवे असे ठाम मत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केले.

वांद्रे कलानगर येथील ‘ओएनजीसी’कडे जाणाऱ्या नाल्याचा समुद्राकडे जाणारा पाण्याचा प्रवाह पालिकेने बंद केल्यामुळे मान्सूनपूर्व अर्ध्या तासाच्या पावसात बीकेसी, कलानगर परिसरात पाणी तुंबले होते. ही बाब संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या आधीच निदर्शनास आणून दिल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कोणताही विचार न करता, सर्वेक्षण न करता असे काम होत असेल तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या