
सोलापूर शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनांतर्गत देणाऱया येणाऱया पेषण आहारामध्ये चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ आढळल्याने जिह्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सांगोला तालुक्यातील घेरडी येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी तालुक्याच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी गावातील रेशन दुकानातून तांदूळ घेतल्यानंतर त्यांना भेसळयुक्त तांदळाचा संशय आला. त्यात प्लॅस्टिक आढळले. त्यांनी गावातील अन्य दुकानांची व शाळेत पोषण आहारासाठी देण्यात आलेल्या तांदळाची तपासणी केली. यात त्यांना चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ आढळले. शालेय पोषण आहारांतर्गत माध्यान्ह भोजनासाठी शाळांना तांदूळ पुरवठा केला जातो. या तांदळाची अद्यापि तपासणी करण्यात आली नाही. सुरेखा पुकळे यांचा मुलगा घेरडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. त्यांना तांदळामधील भेसळचा प्रकार दिसून आल्याने शाळेतील पोषण आहारासाठी देण्यात आलेल्या तांदळातही चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ आढळले. त्यांनी सदरचा तांदूळ मुलांना देऊ नका, अशी सूचना शाळेला केली आहे.
ही घटना गावातील केंद्रप्रमुखांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर तांदळाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. घेरडी गावातील या घटनेने जिह्यात विशेषतः पोषण आहार देणाऱया शाळेतील पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिह्यातील रेशन दुकान व शाळेतील पोषर आहाराकरिता देण्यात आलेल्या तांदळाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.