पडद्याआडून – ऑनिमल एका स्ट्रगलरचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>पराग खोत

मराठी रंगभूमीची एक अद्भुत अशी चुंबकीय शक्ती आहे. रंगभूमीवर आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून विविध माध्यमांत जाऊन यश मिळविलेल्या अनेक नामवंतांनी सध्या पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवलंय. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी यांच्यापाठोपाठ सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर पुन्हा परतलाय. आता तो अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थच्या ‘ताराराम प्रॉडक्शन्स’ तर्फे ‘ऑनिमल’ हे नाटक मराठी तसंच हिंदी रंगभूमीवर दाखल झालंय. हे नाटक केवळ एक सादरीकरण नसून एक अस्वस्थ करणारा अनुभव आहे. महेश मांजरेकर लिखित व दिग्दर्शित या ‘एकपात्री’ नाटकातून प्रेक्षकांना एका तरुणाच्या स्वप्नांच्या, संघर्षांच्या आणि मानसिक विघटनाच्या प्रवासात अक्षरशः ओढून नेलं जातं.

दत्तात्रय ऊर्फ ‘दत्तू’ मांजरसुंभेकर हा मांजरसुंभा ह्या छोटय़ा गावातून मोठय़ा शहरात आलेला एक सर्वसामान्य मुलगा. डोळ्यांत सुपरस्टार होण्याचं स्वप्न आणि मनात निरागस आशा घेऊन तो मुंबईत पाऊल ठेवतो. मात्र, शहराचं वास्तव त्याच्या स्वप्नांइतपं मोहक नसतं. सततचा नकार, अपमान आणि एकटेपणाची झळ त्याला हळूहळू पोखरू लागते. या नाटकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची एकपात्री रचना. सिद्धार्थ जाधव संपूर्ण रंगमंच एकहाती पेलताना केवळ अभिनय करत नाही, तर दत्तूच्या मनातल्या प्रत्येक हालचालीचं जिवंत रूप साकारतो. स्वतःशी, शहराशी आणि काल्पनिक प्रेक्षकांशी संवाद साधत तो आपल्या संघर्षांना कधी गडद विनोदाच्या आवरणात मांडतो, तर कधी अंतर्मुख करणाऱ्या भावनिक स्वगतांमधून उलगडतो. या शैलीमुळे प्रेक्षक आणि पात्र यांच्यात एक थेट आणि घनिष्ठ संबंध निर्माण होतो.

नाटक पुढे सरकतं तसं दत्तूच्या व्यक्तिमत्त्वातील बदल ठळकपणे जाणवू लागतो. सुरुवातीचा निरागस, हसरा दत्तू हळूहळू चिडचिडा, निराश आणि मानसिकदृष्टय़ा अस्थिर होत जातो. त्याच्या हास्यामागे दडलेला राग आणि असंतोष प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. आपल्या गावातल्या प्रेयसीशी पह्नवर गप्पा मारणारा दत्तू, त्याच्या धाकटय़ा बहिणीला होत असलेल्या त्रासाबद्दल दुःखी होणारा दत्तू आणि एपंदरच परिस्थितीसमोर हतबल झालेला दत्तू असा भूमिकेचा मोठा परीघ सिद्धार्थ प्रभावीपणे मांडतो. त्याच्या मनातील खदखद असह्य होत जाते. महत्त्वाकांक्षा आणि वेड यांच्या मधली सूक्ष्म रेषा किती सहजपणे पुसली जाते, याचं यथार्थ चित्रण या नाटकात पाहायला मिळतं. यात इतर काही व्यक्तिरेखा असल्या तरी त्या बोलत नाहीत. बोलतो तो एकटा दत्तू आणि म्हणूनच काहीही न बोलता नाटक पाहणारे आणि अनुभवणारे प्रेक्षकही त्या नाटकाच्या व्यक्तिरेखा होऊन जातात.

महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन येथे विशेष ठरतं. त्यांनी कोणतीही मोठी नाटय़मय मांडणी न करता, अत्यंत मितव्ययी साधनांचा वापर करून एक गडद, विचारप्रवर्तक वातावरण निर्माण केलं आहे. हे नाटक कथा सांगण्यापेक्षा अनुभव देण्यावर भर देतं आणि तो अनुभव प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी ‘ऑनिमल’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. आठ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करताना त्यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर निर्माता म्हणूनही नवी जबाबदारी स्वीकारली आहे. ‘ताराराम’ या त्यांच्या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, त्यात त्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या नव्या पैलूंचा शोध घेतला आहे. त्यांच्या सादरीकरणातली संयतता, गंभीरता आणि अंतर्मुखता विशेष लक्षवेधी ठरते.

मात्र या नाटकात काही ठळक दोष जाणवतात. प्रायोगिक नाटकाच्या अंगाने जाणारं हे नाटक मनोरंजनासाठी नाही हे प्रेक्षकांना आधी ठाऊक नसतं. त्यातली इतर पात्रं बोलत नसल्याचं बरेचदा खटकतं, कारण ती रंगमंचावर खूपच पॅज्युअली वावरतात. दत्तूला आतली घुसमट दाखवण्यासोबतच त्यांच्याकडून प्रतिसाद पण स्वतःच घ्यावा लागतो आणि त्यात त्याची दमछाक होते. ‘ऑनिमल’ या दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी आणि अभिनेता रणवीर कपूरच्या सिनेमाचा संदर्भ इथे वापरलाय जो प्रभावी झाला नाही. नाटकाचे शीर्षकही त्यावरूनच घेतलंय. हेच नाटक यापूर्वी ‘मी शारुक मांजरसुंभेकर’ या नावाने येऊन गेलं आहे. त्यात बदल करून ते आता ‘ऑनिमल’ झालंय. प्रेक्षक सिद्धार्थ जाधवला बघायला येणार हे नक्की, पण त्याची इमेज आणि त्याच्याकडून असलेल्या मनोरंजक नाटकाच्या अपेक्षा यांचे गणित जुळत नाही. नाटकात नेमपं काय आहे हे त्याच्या नावातून, जाहिरातीमधून किंवा इतर कशावरूनही समजत नाही आणि म्हणूनच हे नाटक बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो.

या नाटकाची आणखी एक वेगळी बाब म्हणजे, त्याची द्विभाषिक मांडणी. मराठीसोबतच हिंदी रंगभूमीवरही हे नाटक सादर होणार असल्याने त्याचा आशय अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘ऑनिमल’ शेवटी एक प्रश्न उपस्थित करतं. दत्तू खरंच त्याच्या स्वप्नातील सुपरस्टार बनतो का, की तोही या शहराच्या निर्दयी स्पर्धेत हरवून गेलेल्या असंख्य चेहऱ्यांपैकी एक ठरतो? या प्रश्नाचं उत्तर नाटक देत नाही; मात्र प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतं. एकूणच, ‘ऑनिमल’ हे नाटक समकालीन मराठी रंगभूमीवरचं एक धाडसी, प्रामाणिक आणि अंतर्मुख पाऊल आहे. महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि मानसिक ताण यांचं वास्तववादी चित्रण पाहायचं असेल, तरच हा वेगळा अनुभव घ्यायला जा.

nलेखक/ दिग्दर्शक महेश मांजरेकर

nकलाकार सिद्धार्थ जाधव आणि इतर

nनेपथ्य संदेश बेंद्रे

nप्रकाशयोजना श्याम चव्हाण

nध्वनी व्यवस्था प्रथमेश भोवड

nसंगीत महेश मांजरेकर

nनिर्माता सिद्धार्थ जाधव, ताराराम प्रॉडक्शन्स

nछायाचित्र सौजन्य संजय पेठे