मोदींनी आत्मविश्वास गमावला, जम्मू कश्मीरमधल्या पहिल्याच सभेत राहुल गांधींचा निशाणा

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानसिकदृष्ट्या हरवलं आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच मोदींनी आत्मविश्वास गमावला आहे, आता खांदे खाली पाडून ते संसदेत येतात असेही राहुल गांधी म्हणाले.

जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्ताने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल रामबन भागात सभा घेतली. यावेळी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
गांधी म्हणाले की मोदी म्हणायचे की मी थेट देवाशी बोलतो. पण लोकसभा निवडणुकीत देवाने थेट संदेश दिला आहे की देव फक्त सामान्य माणसांशी बोलतात. देव सामान्य माणसांच्या भलाईसाठी काम करतात. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानसिकदृष्ट्या आम्ही हरवलं आहे. पंतप्रधान मोदींपुढे इंडिया आघाडी समर्थपणे उभी राहिल्याने त्यांचा आत्मिविश्वास हिरावला गेला आहे. पंतप्रधान मोदी पूर्वी छाती फुगवून संसदेत यायचे आता खांदे खाली करून संसदेत यायचे असेही गांधी म्हणाले.

संघाकडून जातिनिहाय जणनगणेचा उल्लेख

राहुल गांधी म्हणाले की भाजपने आधी जातिनिहाय जनगणना करण्यास नकार दिला होता. पण काँग्रेस जातिनिहाय जनगणनेवर ठाम होती. आता संघानेही जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. आधी भाजपने लॅटरल एन्ट्रीचा विषय काढला तर आम्ही विरोध केला. आता भाजपने लॅटरल एन्ट्री करणार नसल्यचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या जनतेला घाबरतात. काँग्रेस भाजपला सत्तेतून हटवेल ती वेळ आता दूर नाही असेही गांधी म्हणाले.

भाजप आणि काँग्रेसची लढाई ही दोन विचारसरणींची

भाजप आणि काँग्रेसची लढाई ही दोन विचारसरणींची आहे असे राहुल गांधी म्हणाले. तसेच एकीकडे द्वेष, हिंसा, भिती तर दुसऱ्या ठिकाणी प्रेम आणि सन्मान आहे. आम्ही कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पायी चाललो. या पदयात्रेत आम्ही नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है असा नारा दिला. भाजप द्वेष पसरवतं तर आम्ही प्रेम. ते तोडतात आणि आम्ही जोडतो असेही राहुल गांधी म्हणाले.