मोठी किंमत चुकवावी लागेल, पण…! ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला पंतप्रधान मोदींचे उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला असून आता तो 50 टक्के केला आहे. याचा परिणाम शेअर बाजारासह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. आता अमेरिकेच्या टॅरिफबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला माहित आहे की मला मोठी किंमत मोजावी लागेल, पण आपण त्यासाठी तयार आहोत. हिंदुस्थान आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही आणि मला वैयक्तिकरित्या माहित आहे की मला यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल पण मी त्यासाठी तयार आहे. नवी दिल्ली येथे एम.एस. स्वामिनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वॉरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत देशातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असेल असे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सर्वांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. हिंदुस्थान शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. आपल्याला माहिती आहे की त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी आपण तयार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की देशात सोयाबीन, मोहरी, शेंगदाण्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर वाढले आहे. त्यांनी यावर भर दिला की, “आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हे सर्वोच्च प्राधान्य आहे. हिंदुस्थान कधीही आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही आणि मला वैयक्तिकरित्या माहित आहे की मला यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल परंतु मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही या ध्येयांवर सतत काम करत आहोत – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या ताकदीला देशाच्या प्रगतीचा आधार मानले आहे.

रशियाकडून हिंदुस्थानने तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी थांबवावी, अन्यथा अतिरिक्त टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. आता त्यांनी टॅरिफ वाढवला आहे. तसेच व्यापार करारात अमेरिकेच्या कृषी आणि डेअरी उत्पादनांना हिंदुस्थानात प्रवेश द्यावा, अशीही अमेरिकेची मागणी आहे. त्याला मान्यता दिल्यास हिंदुस्थानातील कृषी आणि डेअरी उत्पादनांवर विपरीत परिणाम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.