
आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले आणि देशाची तिजोरी गुजरातसाठी उघडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मेक इन इंडियाचा नारा दिला. एकाच वेळी तब्बल 77 हजार कोटींच्या प्रकल्पांची सौगात घेऊन ते गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी दाहोद येथे 24 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे आणि इतर प्रकल्पांचे लोकार्पण केले. जे काय बनवायचेय ते हिंदुस्थानातच बनवा, अशा शब्दांत गुजरातच्या दाहोदमध्ये मेक इन इंडियाचा नारा देतानाच गुजरातमधील रेल्वेच्या जाळय़ाचे 100 टक्के विद्युतीकरण करून गुजरातने आणखी एक लक्ष्य साध्य केले असेही मोदी म्हणाले.
गुजरातच्या आशीर्वादाची शक्ती पाठीशी
आज 26 मे असून आजच्याच दिवशी 2014 मध्ये मी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गुजरातच्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. त्यांच्या आशीर्वादाची शक्ती पाठीशी असल्याने दिवस-रात्र देशातील जनतेच्या सेवेसाठी अक्षरशः जुंपून घेतले, असेही मोदी म्हणाले. त्यानंतर त्यांनी देशातील 140 कोटी जनतेच्या आशीर्वादाचा उल्लेख केला. आपल्या कार्यकाळात जे निर्णय घेतले ते अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, असेही ते म्हणाले.
आपल्या हिश्श्याची भाकरी खा, नाहीतर गोळी खा!
सुखा समाधानाने जगा, आपल्या हिश्श्याची भाकरी खा नाहीतर माझी गोळी आहेच… अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 140 कोटी हिंदुस्थानींना आव्हान दिले होते. आम्ही दहशतवाद्यांचे तळ धुळीला मिळवले असेही ते म्हणाले. जर कुणी आमच्या माता-भगिनींचे पुंकू पुसेल तर अशा स्थितीत आपण कसे गप्प बसणार, तुम्हीच सांगा. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की मोदीशी मुकाबला करणे किती भारी पडेल, असेही मोदी म्हणाले.