PM Narendra Modi – पावसाने खेळ केला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. तसेच आजही पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन, उद्घाटने आणि योजनांच्या घोषणांचा पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येणार होते. मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. यामध्ये इतरही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार होते.

मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावर पावसाने पाणी फिरवले. बुधवारी शहरभर पावसाने थैमान घातले होते. मोदींच्या सभेची आणि सर्व व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभामंडपात पावसाचे पाणी आणि चिखल होऊन सर्वत्र दलदल झाली. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहेत, त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरले आहे.

स्टेजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्या ठिकाणी चिखल झालेला आहे. महापालिका आणि मेट्रोचे अधिकारी सभास्थळी पाहणी करीत आहेत. त्यामुळे बुधवारी उशिरापर्यंत व्यासपीठाच्या परिसरात व दलदलीवर खडी टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी खडीचे दहा ते बारा ट्रक मागविण्यात आले होते. ही सभा यशस्वी करण्याचे आव्हान असतानाच आता मोदींचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.