
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत युवकांना रोजगारक्षम बनवण्याचा उद्देश असताना, प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील पिरागढी परिसरातील एका छोट्या स्वयंसेवी संस्थेपासून ते देशभरातील प्रशिक्षण केंद्रांपर्यंत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता केवळ कागदोपत्री नोंदी, फोटो आणि बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे निधी उचलल्याचे प्रकार घडल्याचे अनेक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. द प्रिंटने या बाबत वृत्त दिले आहे.
2016 च्या सुमारास काही विद्यार्थ्यांना बसने नेऊन दिल्लीतल्या रोहिणी भागात मोठ्या प्रशिक्षण केंद्रात बसवून फोटो काढण्यात आले. हे फोटो आणि व्हिडिओ कौशल्य प्रशिक्षण झाल्याचा पुरावा म्हणून वापरण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांना ना नोकऱ्या मिळाल्या, ना संस्थांना ठरलेले पैसे मिळाले. अनेक छोट्या स्वयंसेवी संस्थांना दलालांमार्फत विद्यार्थी पुरवण्यास भाग पाडले गेले आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या संपूर्ण योजनेतील गंभीर त्रुटी नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) यांच्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या कार्यप्रदर्शन अहवालात उघड झाल्या आहेत. PMKVY 2.0 आणि 3.0 टप्प्यात सुमारे 94.53 टक्के लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती अपूर्ण, चुकीची किंवा बनावट असल्याचे आढळून आले. अनेक प्रशिक्षण केंद्रे केवळ कागदावर अस्तित्वात होती, तर प्रत्यक्षात बंद असल्याचे निरीक्षणात आले.
दरम्यान, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) या अहवालाची गंभीर दखल घेत चौथ्या टप्प्यात (2022–2026) सुधारणा केल्याचा दावा केला आहे. फेस ऑथेंटिकेशन, जिओ-टॅग्ड उपस्थिती, QR कोड असलेली प्रमाणपत्रे आणि आधार-आधारित e-KYC यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, अनेक भागांत प्रशिक्षण केंद्रे बंद पडलेली असून, युवक अजूनही रोजगाराविना असल्याचे वास्तव कायम आहे.
असा झाला घोटाळा
1. PMKVY अंतर्गत प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता केवळ फोटो, व्हिडिओ आणि बायोमेट्रिक हजेरीद्वारे निधी उचलल्याचे प्रकार
2. छोट्या स्वयंसेवी संस्थांना दलालांमार्फत विद्यार्थी पुरवण्यास भाग पाडून फसवणूक
3. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी 6–7 महिन्यांचा विलंब
4. CAG अहवालानुसार 94.53% लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती चुकीची किंवा अपूर्ण
5. काही प्रशिक्षण केंद्रे केवळ कागदावर अस्तित्वात, प्रत्यक्षात बंद
6. 84% प्रशिक्षण उद्दिष्टे केवळ 10% मोठ्या प्रशिक्षण भागीदारांना देण्यात आली
7. अनेक विद्यार्थ्यांना ना प्रशिक्षण, ना नोकरी; तरीही कागदोपत्री ‘प्रशिक्षित’ दाखवले
8. प्रशिक्षकांचे वेतन थकलेले; बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने खाती उघडल्याचे आरोप
9. PMKVY 4.0 मध्ये फेस ऑथेंटिकेशन, जिओ-टॅगिंग, QR प्रमाणपत्रे लागू केल्याचा दावा
10. तरीही देशभरात अनेक PMKVY प्रशिक्षण केंद्रे बंद; योजना अजूनही प्रश्नांकित



























































