
अहिल्यानगर, दि. 22 (प्रतिनिधी) – अमेरिका-इस्त्र्ााईल-इराण युद्धामुळे आखाती देशांमधून होणाऱया गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे देशभरात गॅस टंचाईची स्थिती असून, गॅसअभावी अनेक उद्योगांची चाके थांबली आहेत. अहिल्यानगर एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद आहेत. परिणामी कामगारांना बसवून ठेवावे लागत आहे. अशा स्थितीत जास्त काळ उद्योग बंद ठेवता येणार नाहीत. त्यामुळे या उद्योगांना पीएनजी गॅस देण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पीएनजी गॅसजोडणी सुरू करण्यात आली आहे.
गॅस हा जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे केंद्र सरकारने घरगुती वापराला पहिले प्राधान्य दिले आहे. त्यामुळे व्यावसायिक, औद्योगिक पुरवठा थांबवण्यात आला आहे. गॅसचा पुरवठा थांबल्याने एमआयडीसीतील ज्या कंपन्यांचे काम गॅसवर अवलंबून होते, अशा कंपन्यांचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. परिणामी या बंद झालेल्या कंपन्यांकडून पुढील कंपनीला जाणारा मटेरियल सप्लायदेखील थांबला आहे. त्यामुळे एका कंपनीसोबत इतर अनेक कंपन्याही गॅसटंचाईत भरडल्या जात आहेत. अनेक मोठय़ा कंपन्यांनी शिफ्ट कमी केल्या आहेत. परिणामी कामगारांना सुट्टय़ा देणे किंवा कंपनीत बोलावून बसवून ठेवले जात आहे.
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी उद्योजकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत बैठका घेत, यावर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता उद्योजकांच्या या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. जिल्हाधिकाऱयांनी पीएनजी गॅसपुरवठा करणाऱया बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱयांशी बैठक घेत उद्योगांना तातडीने जोडणी देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बीपीसीएल कंपनीकडून एमआयडीसीमध्ये पीएनजी गॅसजोडणी वेगात सुरू आहे. एमआयडीसीतील 4 ते 5 कंपन्यांना पाइपलाइनद्वारे गॅसची जोडणी देण्यात आली असून, इतर कंपन्यांचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे लवकरच गॅस आवश्यक असलेल्या सर्व कंपन्यांना गॅसजोडणी मिळून काम पूर्ववत सुरू होईल, असा आशावाद आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी व्यक्त केला.
इतर ठिकाणी कामे सुरू
n पीएनजी गॅसजोडणीची कामे इतर अनेक ठिकाणी सुरू आहेत. सर्व कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत आहेत. त्यामुळे कंपन्यांना गॅसजोडणी देताना अडचणी उद्भवत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी रस्ते क्रॉस करावे लागत आहेत.























































