
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या फरार आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी न्यायालयासमोर आणलं असून खेडकर यांच्यासह आणि इतर सहा जणांविरुद्ध एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम 307 जोडलं गेलं, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची 7 दिवसांची कोठडी मागितली आहे. न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या फरार आईला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील पौड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमधून मनोरमा यांना ताब्यात घेतले. या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर या ‘इंदुबाई’ बनून रहात असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्पत्याविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधीत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. शोध घेत असताना खबऱ्यामार्फत पोलिसांना मनोरमा खेडकर या महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक मनोरमाला ताब्यात घेण्यासाठी महाडकडे रवाना झाले.
Maharashtra: Section 307 of IPC added to existing FIR against Manorama Khedkar and six others, police informs court.
Police seeks 7-day custody of Manorama Khedkar
— ANI (@ANI) July 18, 2024
मनोरमा खेडकर एका मुलासोबत महाडच्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास हुंडाई कंपनीच्या कारने (क्र. एमएच 14, एसयू 4877) त्या हॉटेलमध्ये आल्या होत्या. दोघांनीही आम्ही मायलेक असल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली होती.
यासंबंधी हॉटेल मालक अनंत यांनी माहिती देताना सांगितले की, मनोरमा यांनी आपले नाव इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे आणि त्यांच्यासोबच्या मुलाने दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे असे सांगितले होते. हॉटेलच्या रजिस्टरमध्येही तशी नोंद करत आम्ही मायलेक असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनी एक रुम बूक केली. मात्र बुधवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास महिला कॉन्सेटबलसह पोलिसांचे एक पथक येथे आले आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेऊन सकाळी साडे सहाच्या सुमारास निघून गेले.
दरम्यान, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस मनोरमा यांचा शोध घेत होते, मात्र त्या वारंवार पोलिसांना गुंगारा देत होत्या. त्यांचा फोनही बंद लागत होता. पोलिसांच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मनोरमा यांना महाडमधून अटक करण्यात आली असून त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असे सांगितले जात आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझे नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी त्यांच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.