Police diary: रुग्णालय व मंदिरात बाऊन्सर ठेवा!

>> प्रभाकर पवार ([email protected])

8 ऑगस्ट (गुरुवारी) रात्री 11.15 वाजता ‘ती’ तिच्या जन्मदात्या आईशी बोलली, “आई, मी सतत 36 तास काम केले आहे. आता मी फारच थकले आहे. काहीतरी पोटात टाकून मी रुग्णालयाच्या हॉलमध्ये झोपणार आहे” सकाळी मी तुला फोन करीन, असेही त्या माऊलीने आपल्या आईला मोबाईलवर सांगितले. त्यानंतर तिचा आवाज कायमचा बंद झाला. शुक्रवार (9 ऑगस्ट) उजाडला. सकाळचे 10 वाजले तरी आपल्या मुलीचा फोन आला नाही तेव्हा आई-वडील चिंतेत पडले. त्याचदरम्यान कोलकात्याच्या आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या आपल्या मुलीने आत्महत्या केली असा फोन तिच्या वडिलांना आला. हे ऐकून आर.जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर असलेल्या 31 वर्षीय मुलीचे आई-वडील हादरून गेले.

आर. जी. कार कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या त्या मुलीने आत्महत्या नाही तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर तर त्या मुलीच्या आई-वडिलांनीच आपले जीवन संपविण्याचा क्षणभर विचार केला. परंतु अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी विचार बदलला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणी सरकारी आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये रात्री एकटीच झोपली होती. त्या वेळी पहाटे 3 ते 5 यादरम्यान या डॉक्टर तरुणीवर हल्ला करण्यात आला. त्या वेळी तिचे डोके व डोळेही फोडण्यात आले. गुप्तांगावर, शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमा पाहता नराधमाने क्रौर्याची सीमा पार केली होती.

2012 साली दिल्लीत फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉक्टर तरुणीवर झालेल्या गैंग रेपची आठवण व्हावी असा हा निर्भया ‘पार्ट-2’ प्रकार होता. इतक्या रानटी पद्धतीने प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. रात्री उशिरा सेमिनार हॉलजवळ रेंगाळणाऱ्या संजय रॉय (33) या स्थानिक पोलिसांच्या दलालाला सीबीआयने ताब्यात घेतल्यावर बॉक्सर असलेल्या या दुष्टात्म्याने आपल्या क्रूरतेची कबुली दिली. संजय रॉय नावाचा हा हैवान विवाहित असून नशापान करून शरीरसुखासाठी तो महिलांशी अत्यंत घृणास्पद कृत्य करतो, अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळे त्याच्याशी लग्न केलेली एकही महिला त्याच्या सोबत राहिली नाही चार बायका घर सोडून निघून गेल्या व या क्रूरकर्त्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले. तरीही तो पोलिसांचा खबऱ्या म्हणून कालपरवापर्यंत कार्यरत होता. त्यांच्यासाठी तो स्वयंसेवक म्हणून काम करीत होता पोलीस असल्याचा टी-शर्ट तो कसा वापरत होता, याचे आश्चर्य वाटते. पोलिसांचे खबरे, दलाल म्हणून काम करणारे बरेचसे बनवाबनवी करणारेच असतात. त्यामुळेच खबऱ्यांच्या हत्या होतात.

मुंबई क्राइम बॅचच्या अधिकाऱ्यांनी तर महिलांवर अत्याचार करणाऱ्या शफी तुफानी या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या खबऱ्याला पायधुनी येथे चकमकीत ठार मारून त्याच्या क्रौर्याला मूठमाती दिली होती. कोलकाता पोलिसांनी हे काम वेळीच केले असते तर एका निष्पाप डॉक्टर तरुणीचे प्राण वाचले असते. संजय रॉय या राक्षसाला वाढवायचे काम कोलकाता पोलिसांनी केले. सर्व पोलिसांनी यापासून बोध घ्यायला पाहिजे. खबरे पाळताना काळजी घेतली पाहिजे.

संजय रॉयच्या जंगली अत्याचाराची बळी ठरलेली 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर एका गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील शिंपी आहेत. कष्ट करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवायचे आई-वडिलांना सुखाचे दिवस आणायचे हे त्या मुलीचे स्वप्न होते. परंतु क्षणिक लैंगिक सुखासाठी पिसाळलेल्या संजय रॉय नावाच्या कुत्र्याने ते उद्ध्वस्त केले मेडिकल कॉलेजमध्येच प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिच्या क्रूर पद्धतीने केलेल्या हत्येचे पडसाद पश्चिम बंगालसह साऱ्या देशात उमटले. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांनी देशभरात निदर्शने केली. असाच कुणाच्याही धमन्या तापविणारा संतापजनक प्रकार 5 वर्षांपूर्वी तेलंगणाच्या हैदराबाद शहरात घडला होता. 25 वर्षीय डॉ. प्रियंका रेड्डी हिच्यावर बलात्कार करून तिला पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. तेव्हाही हैदराबादसह सारा देश पेटून उठला होता. 27 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 9.30 ची वेळ होती. डॉ. प्रियंकाची स्कूटर पंक्चर झाली तेव्हा टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या ट्रक चालक व त्याच्या साथीदारांनी प्रियंकाला मदत करण्याचा बहाणा केला व तिचे अपहरण करून तिच्यावर चौघा जणांनी
आळीपाळीने बलात्कार केला. तिने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. अशा सैतानांना हैदराबादचे पोलीस आयुक्त विश्वनाथ सज्जनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी 24 तासांत पकडले. त्यांच्या कृत्याची कबुली घेतली व ज्या जागेवर प्रियंकाला जाळून मारले होते त्याच जागेवर नेऊन सज्जनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना गोळ्या घालून ठार मारले. याला म्हणतात Courage, धैर्य, शौर्य कोणत्याही परिणामांची पर्वा न करता सज्जनार यांनी हे धाडस केले. पुढे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

आर. जी. कार मेडिकल कॉलेजमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर कोलकाता पोलीस खवळून उठले पाहिजे होते, परंतु बर्फासारखे थंड असलेले कोलकाताचे वादग्रस्त पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी आर जी कार हॉस्पिटलची नासधूस सुरू असताना, रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले असे असताना केवळ बघ्याची भूमिका घेतली तेव्हा भेकड पोलीस समाजात असतील तर आमच्या आयाबहिणी कशा सुरक्षित राहतील? आज कोणतीच महिला, लहान मुलं कुठेच सुरक्षित नाहीत. रोज कुठे ना कुठेतरी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. आता हे प्रकार रुग्णालयात वाढू लागले आहेत. केईएम रुग्णालयात नर्सचे काम करणारी अतिशय सुंदर तरुणी अरुणा शानबाग हिच्यावर त्याच रुग्णालयात स्वीपरचे काम करणाऱ्या मोहनलाल वाल्मीकी या झाडूवाल्याने 1973 साली प्राणघातक हल्ला करून तिच्यावर बलात्कार केला. ती तरुणी कोमात गेली ती परत कधी उठलीच नाही. 42 वर्षांनी अरुणाने केईएममध्येच (2015 साली) अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आजही परळच्या केईएम रुग्णालयामध्ये भीतीचे सावट आहे. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी रुग्णालयात (सुविधा नसल्याने) निवासी डॉक्टर, परिचारिका जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. रात्रपाळीच्या वेळी सहकाऱ्यांवर जरी विश्वास असला तरी सुरक्षेबाबत निश्चित राहता येत नाही. आज मंदिरेही सुरक्षित राहिली नाहीत. देवासमोरच पुजारी भाविक महिलांवर बलात्कार करीत आहेत. त्यामुळे असे प्रकार वाढले तर उद्या रुग्णालय व मंदिरांमध्ये बाऊन्सर ठेवावे लागतील. नव्हे, आता शाळा- कॉलेजमध्येही ठेवावे लागतील. बदलापूर येथील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन मुलीवर एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी दरमहा 1500 रुपये देऊन महिलांना (मतदानासाठी) लाचार करू नका! त्यांना मोफत काही नको! त्यांना स्वाभिमान हवा आहे. सुरक्षा व संरक्षण हवे आहे. हाताला काम हवे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे.