Bhandup Bus Accident …तर 30 जण चिरडले गेले असते

भांडुप पश्चिमेकडील स्टेशन रोड परिसरात बेस्ट बसच्या अपघातात चार जणांचा नाहक जीव गेला तर 11 जण गंभीर झाले होते. पण त्यावेळी आणखी मोठा अनर्थ घडला असता. चालकाने बस उजव्या बाजूला वळविली नसती तर आणखी 25 ते 30 जणांना बसने चिरडले असते असे पोलिसांकडून सांगण्यात येते.

भांडुपच्या स्टेशन रोड परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस तेथील अरूंद मार्गावरून भरधाव गेली. परिणामी अनेक पादचारी बसच्या चाकाखाली आले. तर अनेकांना बसची जोरदार धडक बसली. त्यात चौघांचा जागीच मृत्यु तर 11 जण गंभीर जखमी झाले. पण आता नविन बाब समोर आली आहे. त्याक्षणी फुटपाथवर अनेक लोपं बसची वाट पाहत उभे होते. 606 क्रमांकाची बस अनेकांना धडक देत पुढे जात असताना चालकाने त्याही परिस्थितीत प्रसंगावधान राखत बस उजव्या बाजूला वळवली. त्यामुळे फुटपाथवर रांगेत उभे असलेल्या लोकांपर्यंत जाऊ शकली नाही. बस तशीच पुढे गेली असती तर आणखी 25 ते 30 जणांना चिरडून त्या नागरिकांचाही  बळी गेला असता असे चालकाच्या जबाबातून समोर येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. भांडूप पोलिस चालकाची कसून चौकशी करीत आहेत.

परिसर मोकळा ठेवा

एखादी घटना होण्याची वाट का पाहिली जाते. आधीच कठोर भुमिका का घेतली जात नाही. आता भांडूप पश्चिमेकडील स्टेशन रोड परिसर अपघात झाल्यानंतर फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे. असाच हा परिसर मोकळा ठेवायला हवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पालिकेने याची जबाबदारी घ्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे.

फेरीवाला दिसला तर सोडणार नाही

आधीच अरूंद रस्ता, त्यात बस, रिक्षांची वर्दळ आणि पादचाऱयांचा सततचा राबता, त्यात बेकायदेशीर फेरीवाल्यांचा भरणा, अशी बिकट परिस्थिती भांडूप पश्चिमेकडील स्टेशन रोडवर असायची. त्यात सोमवारी त्या मार्गावर भीषण अपघात झाल्याने बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आता या मार्गावर फेरीवाल्यांना अजिबात बसवू द्यायचे नाही. जो कोणी दुकानदार पैसे घेऊन आपल्या दुकानासमोर फेरीवाल्याला धंदा करायला बसवेल किंवा कोणी दादागिरी करत बेकायदीशरपणे रस्ता अडवून धंदा करेल अशा कोणालाही सोडणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा भांडूप पोलिसांकडून देण्यात येत आहे.